कोल्हापूर (शिवानी प्रभावळे) – मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’मुळे घराघरांत लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव हिचा अपघाती मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी कोल्हापुरमध्ये हालोंडी-फाटा येथे ‘प्रेमाची भाकरी लई भारी’ या नावाने कल्याणीने हॉटेल चालू केले होते. शनिवारी रात्री हॉटेल बंद करून बाहेर पडल्यानंतर कोल्हापूर-सांगली महामार्गावरील, हालोंडीनजीक डंपरने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला आहे. कल्याणी ही छोट्या पडद्यावरुन प्रसिद्धीझोतात आली होती. तिने झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत सहाय्यक व्यक्तिरेखेची भूमिका साकारली होती. यामुळे तिला घराघरात ओळख मिळाली. त्याबरोबर तिने सन मराठी या वाहिनीवरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेतही काम केले होते. तिची ही भूमिकाही चांगलीच गाजली होती.
कल्याणी कुरळे-जाधव ही मुळची कोल्हापुराची असून, सध्या महावीर कॉलेज परिसरात राहत होती. कोल्हापूर-सांगली हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या गोष्टीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या मार्गावर काही दिवसांपूर्वीच शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात आले होते. पण आता याच मार्गावर डंपरच्या धडकेमुळे अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याने महामार्ग दुरुस्त करण्याची मागणी पुन्हा केली जात आहे.
कल्याणी जाधव हिने तुझ्यात जीव रंगला या मालिकेसह अनेक नामवंत मराठी मालिकेत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. दोन आठवड्यांपूर्वीच तिने प्रेमाची भाकरी लई भारी या नावाने हालोंडी फाटा येथे हॉटेल चालू आहे. तर आठवड्यापूर्वीच कल्याणीने आपला वाढदिवसही साजरा केला होता. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओमध्ये ती भाकर्या थापताना दिसली. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने म्हंटले आहे की, ‘माझा वाढदिवस मी लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला देण्यात घालवला… मला खूप आनंद झाला मी माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुठेही बाहेर गेले नाही ना पार्टी केली… मी माझ्या वाढदिवसानिमित्त लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला घातली हे फक्त स्वामींनी माझ्याकडून करून घेतले आहे. असे प्रत्येक वाढदिवसाला होऊ दे… स्वामी मला तुमचे आशीर्वाद तर आहेतच असेच आशीर्वाद नेहमी असूदेत… मला हे सगळ करण्यासाठी शक्ती द्या.’ ही तिची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. इंस्टाग्रामवर तिचे तीन हजार पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तिच्या अपघाती निधनाने मराठी सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.