– गावाची विकासकामे खोळंबल्याने जनमाणसही संतप्त!
चिखली (विशेष प्रतिनिधी) – गावाच्या विकासकामांत कसूर करणे, आणि सरपंचपदाचे निहित कर्तव्य पार पाडण्यास टाळाटाळ करण्यासह, शेळगाव आटोळ येथील सरपंच यांच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उपसरपंच यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य यांनी गटविकास अधिकारी चिखली यांच्याकडे केली आहे. विद्यमान सरपंचाच्या कार्यकाळात विकासकामे रखडल्याने गावात मोठा राजकीय पेच निर्माण झालेला आहे.
सविस्तर असे, की शेळगाव आटोळ ग्रामपंचायत सरपंचपदी नागरिकांचा मागासप्रवर्ग महिलासाठी आरक्षित जागेवर सौ. सुरेखा सुरेश राजे यांची ११ फेब्रुवारी २०२१ रोजी निवड करण्यात आली होती. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे जवळजवळ पावणेदोन वर्षात १५ वा वित्त आयोगाचा लाखो रुपयांचा निधी ग्रामपंचायत कार्यालयाला प्राप्त झालेला असताना आणि कृती आराखड्याच्या तरतुदीनुसार मासिक सभेत ठराव मंजूर होऊनसुद्धा एक रुपयादेखील खर्च करण्यात आला नाही, यामुळे गावातील विकासकामे थांबली असून, गावात मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्या आहेत.
स्वच्छतेच्या दृष्टीने गावात नवीन नाली बांधकाम करणे, जुनी नाली बांधकाम दुरूस्ती करणे अत्यावश्यक होते, व तशी मागणी सदस्यांकडून वारंवार होत असतानादेखील जाणीवपूर्वक या कमाकडे दुर्लक्ष करणे, गावातील नागरिकांनी नवीन नळ कनेक्शन जोडणी करून देण्याची वारंवार मागणी करूनही आणि जलजीवन मिशनच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून मागेल त्याला नवीन नळ कनेक्शन जोडणी करून देणे आवश्यक असतानादेखील मुद्दामहून या कामाकडे दुर्लक्ष करणे, जिल्हा परिषदेच्या मराठी प्राथमिक शाळेच्या दुरूस्तीसाठी संबंधित मुख्याध्यापक यांचेकडून दुरुस्तीची मागणी करण्यात आली असतानादेखील दुरुस्तीचे काम करण्यात हयगय करणे, मागासवर्गीय वस्तीच्या विकासासाठी १५ व्या वित्त आयोगाच्या कृति आराखड्यात तरतूद करण्यात आलेली असतानादेखील सरपंचाच्या उदासीनतेमुळे सबंधित वस्तीत विकासकामे न करणे, वाढीव वस्तीत नवीन पाइपलाइनचे काम करणे आवश्यक असूनही सदर काम प्रलंबित ठेवणे, याव्यतिरिक्त वैदूवाडी वसतीकरिता स्वतंत्र विहिरीचे खोदकाम व विहिरिपासून वस्तीपर्यंत पाइपलाइनचे कामदेखील मागील सरपंच यांच्या कार्यकाळात पूर्ण करण्यात आले आहे. परंतु केवळ विद्यमान सरपंच यांच्या निष्काळजीमुळे सदर विहिरीजवळून विद्युत वाहिनी गेलेली असतानादेखील मोटारपंप करिता विद्युत पुरवठा ऊपलब्ध होऊ न शकल्याने सदर वसतीला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
वरील सर्व विकासकामांसाठी ग्रामपंचायत उपसरपंच आणि सदस्य यांनी वारंवार पाठपुरावा करूनदेखील विद्यमान सरपंच यांनी गावाच्या मूलभूत गरजांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी संबंधितावर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार गटविकास अधिकारी पंचायत समिती चिखली यांचेकडे करण्यात आली आहे. तक्रार अर्जावर उपसरपंच संतोष बोर्डे, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव देशमुख, वैâलास बोर्डे, सौ. वनिता मिसाळ, सौ. आशा बोर्डे यांच्या सह्या आहेत.
—————–