सुरजभैय्या यादव यांचा पुण्यात ‘समाज गौरव’ पुरस्काराने सन्मान
खामगाव (तालुका प्रतिनिधी) – गोसेवा तसेच रुग्ण सेवेत सदैव अग्रेसर राहणार्या एकनिष्ठा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या यादव यांना आज (दि.११) पुणे येथे समाज गौरव पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.
राजमाता बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था लातूर या सामाजिक संस्थेने अन्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या समाज सेवकांचा सन्मान कार्यक्रम घेऊन त्यांच्या कार्याला प्रोत्साहन दिले. यासाठी उल्लेखनीय कामगिरी करणार्या समाज सेवकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संत तुकाराम नगर, पिंपरी-चिंचवड येथे हा सोहळा पार पडला. या प्रसंगी मान्यवरांच्याहस्ते हा सन्मान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष बालाजीभैया जाधव, संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा कल्पना काटकर, सुचित्रा अहिरे, आणि संस्थेचे पदाधिकारी यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते.
एकनिष्ठा फाऊंडेशन खामगांवचे महाराष्ट्रात वैद्यकीय, गोसेवा, रक्तसेवा, दिव्यांगासाठी विविध उपक्रमांत कार्यरत आहे. या संस्थेचे संस्थापक सुरजभैय्या यादव यांना समाज गौरव पुरस्कार देऊन त्याच्या कार्याचा उचित गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना सुरजभैय्या यादव यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या प्रसंगी नारायण शिरगांवकर सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे जिल्हा, रविंद्र मिर्लेकर शिवसेना माजी आमदार, अभयदादा भोर उद्योजक पुणे, वसंत सुतार मुंबई केईम हॉस्पिटल समाज विकास अधिकारी, यशवंत यादव पुणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला, अशी माहिती सिद्धेश्वर निर्मळ यांनी दिली.
—————–