शेगाव येथे राहुल गांधी यांच्या विक्रमी सभेची जय्यत तयारी, ६ लाखांचा जनसमुदाय येण्याची शक्यता!
– शरद पवार, उद्धव ठाकरे हे नेतेही जाहीर सभेला उपस्थित राहणार
– राहुल गांधी टाळ हाती घेऊन खेळणार पाऊली, संत गजानन महाराजांचेही घेणार दर्शन
– ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ करणार जाहीर सभा व पदयात्रेचे ‘लाईव्ह’ प्रक्षेपण
बुलढाणा (एकनाथ माळेकर) – काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते काश्मीर अशी पदयात्रा सुरू असून, ही पदयात्रा महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातून जाणार आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांची संत गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या शेगाव नगरीत १८ नोव्हेंबररोजी भव्य जाहीर सभा होणार असून, या सभेला सहा लाखांचा जमाव जमण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सायंकाळी ही जंगी सभा होणार आहे. या सभेच्या व पदयात्रेच्या नियोजनासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, चंद्रकांत हंडोरे, यशोमती ठाकूर, हर्षवर्धन सपकाळ हे बडे नेते शेगावमध्ये तळ ठोकून असून, यात्रेचे व सभेचे नियोजन करत आहेत. आज या नेत्यांनी सभास्थळाची पाहणी केली. दरम्यान, राहुल गांधी यांची जाहीर सभा व बुलढाणा जिल्ह्यातील पदयात्रा याचे लाईव्ह प्रक्षेपण ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ची टीम करणार आहे.
राहुल गांधी यांची ही पदयात्रा तीन दिवस जिल्ह्यात राहणार आहे. त्यामुळे सभेच्या नियोजनासाठी सभास्थळाची पाहणी करणे, आगमन व निर्गमन रस्त्यांची पाहणी करणे, यासाठी राहुल गांधींच्या पदायात्रेआधीच काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी शेगावात तळ ठोकलेला आहे. या यात्रेला जवळपास सहा लाख लोकं येणार असल्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. शेगावातील सभेतून बेरोजगारी आणि ढासळलेली अर्थव्यवस्थेवरून राहुल गांधी हे भाजपवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.
त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी सभास्थळाची आज अधिकारीवर्गासोबत पाहणी व चर्चा केली. याप्रसंगी काँग्रेसचे प्रवीण देशमुख, प्रदेश सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर, किरणबापू देशमुख, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री आमदार अॅड यशोमती ठाकूर यांची उपस्थिती होती. आज शासकीय विश्रामगृहावर त्यांनी काँग्रेसच्या पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्त्यांचीही बैठक घेतली. या बैठकीला राज्यभरातून जिल्हाध्यक्ष व त्यांचे प्रतिनिधी बोलावले गेले होते, त्यांच्यासोबत चर्चा करताना माजी आमदार व जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, आमदार राजेश एकडे, श्याम भाऊ उमाळकर, हाजी दादु सेठ, कैलास बापू देशमुख, किरण बापू देशमुख, धनंजय बापू देशमुख, वसंतराव बापू देशमुख, कलीम खान, जयंत खेडकर, प्राध्यापक गजानन खरात आदींनीदेखील सविस्तर चर्चा व मार्गदर्शन केले. या बैठकीत प्रत्येक जिल्ह्याला दोन ते तीन रूम व जास्त असलेले कार्यकर्त्यांना मंगल कार्यालय अशा प्रकारची निवासाची व्यवस्था करण्यात आली. आज आमदार विकास ठाकरे, आमदार शिरीष चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष नानाभाऊ गावंडे, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, राम विजय बुरुंगले, शेगावातील सलामपुरिया व इत्यादी मान्यवर उपस्थित होते. एकूणच राहुल गांधी यांची सभा व पदयात्रा यशस्वी करण्यासाठी काँग्रेसने काटेकोर नियोजन चालवलेले आहे.
महाराष्ट्रात आगमन झाल्यानंतर राहुल गांधी यांच्या भोजन आणि न्याहारीसाठी मराठवाडा आणि खान्देशातील पाककृतींवर भर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राहुल गांधी यांची ही पदयात्रा यशस्वी करण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी जोरदार तयारी केली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी भारत जोडोयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसकडून करण्यात आले आहे.
राहुल गांधी वारकर्यांसोबत खेळणार पाऊली!
खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील वरखेड फाट्यावर वारकरी संप्रदायातर्पेâ गोल रिंगण केले जाणार असून, यात राहुल गांधी टाळ हाती घेऊन पावली खेळणार आहेत. तसेच श्री संत गजानन महाराज मंदिरात जाऊन ‘श्रीं’च्या समाधीचे दर्शनही घेणार असल्याने वारकरी संप्रदायात उत्साहाचे वातावरण आहे. राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील दुसरी व शेवटची जाहीर सभा संतनगरी शेगाव येथे शुक्रवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली असून, या सभेच्या तयारीने वेग घेतला आहे. संपूर्ण शेगाव नगरी तिरंगा ध्वजांनी सजली असून, पदयात्रेच्या नियोजनासाठी काँग्रेस नेत्यांचा राबता वाढला आहे. सभेसाठी पाडलिवाल मैदानावर व्यासपीठाची उभारणी सुरू झाली आहे. यात मुख्य व्यासपीठाखेरीज भारत यात्रींसाठी व पक्षाच्या पदाधिकार्यांसाठी स्वतंत्र व्यासपीठ राहणार आहे. मुख्य व्यासपीठाच्या येथे दाखल दृकश्राव्य पडद्यावर महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविले जाणार आहे, तर सभेपूर्वी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
—————–