मोदी सरकारच्या काळात पीकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट : राहुल गांधी
कळमनुरी, हिंगोली (तालुका प्रतिनिधी) – मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मागील आठ वर्षात शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्गाचे अपरिमित नुकसान झाले आहे. मनरेगाचा रोजगार मिळत नाही, कामगारांच्या हाताला काम नाही, पैसाही नाही. शेतात राबराब राबणाऱ्या शेतकरी देशोधडीला लावला आहे. पीकविम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जातात पण नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना दमडीही मिळत नाही, विमा कंपन्या शेतकऱ्यांची खुलेआमपणे लूट करत आहेत, असा आरोप खा. राहुल गांधी यांनी कळमनुरीच्या चौक सभेत केला.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे आज पदयात्रेचा आजचा दिवस संपला. यावेळी चौकसभेत जनसमुदाला संबोधित करताना राहुलजी गांधी यांनी मोदी सरकारवर चौफेर हल्ला चढवला. कळमनुरी भागात काही शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी शेतातील सर्व पीक वाया गेल्याचे दाखवले, सोयाबीन पुर्णपणे जळून गेले होते पण पीकविमा कंपन्याकडून नुकसान भरपाई मिळत नाही. कोणाकडे दाद मागावी हेही समजत नाही अशी अवस्था असल्याचे शेतकऱ्याने सांगितले. मोदी सरकारच्या काळात शेतकरी व शेती संपवण्याचे काम केले जात आहे. शेतकऱ्यांकडून विमाचे हप्त्यापोटी पैसे घेतले जातात पण नुकसान भरपाई मात्र मिळत नाही, मिळाली तर अत्यंत तुटपुंजी मिळते. मोदी सरकारमध्ये पीकविमा कंपन्या मालामाल झाल्या आहेत आणि शेतकरी मात्र कंगाल झाला आहे. राहुल गांधी यांनी यावेळी स्व. राजीव सातव यांच्या आठवणींना उजाळा दिला. राजीव माझे मित्र होते, काम चांगले करायचे, त्यांनी नेहमीच तुमच्यासाठी काम केले असे राहुल गांधी म्हणाले.
देशात द्वेष पसरवला जात आहे, भांडणे लावली जात आहेत पण या देशात द्वेष पसरवणाऱ्यांना स्थान नाही. भारत जोडो यात्रा कन्याकुमारीहून निघाली असून श्रीनगरमध्ये जाऊन तिरंगा फडकवूनच थांबणार आहे. देशातील सर्वसामान्यांचे प्रश्न हाती घेऊन आम्ही ही पदयात्रा काढली असून तुमचे प्रेम व शक्तीच आम्हाला चालण्याची प्रेरणा देते, असेही राहुलजी गांधी म्हणाले. व्यासपीठावर विधिमंडळ पक्षनेते व पदयात्रेचे समन्वयक बाळासाहेब थोरात, माजी मंत्री वर्षा गायकवाड, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, खा. रजनी सातव, प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी संपतकुमार, आमदार डॉ. प्रज्ञा सातव आदी उपस्थित होते.