Breaking newsHead linesMaharashtra

परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांनाही मदत मिळणार!

मुंबई (प्राची कुलकर्णी) – राज्यभरात विशेष करून विदर्भ व मराठवाड्यात ऑक्टोबर महिन्यामध्ये परतीच्या पावसाने सोयाबीन, कपाशीसह इतर खरिपाच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, २५ लाख हेक्टर शेतजमिनीवरील पिकांचे नुकसान झाले असून, महसूल व कृषी विभागाचे पंचनामे सुरु आहेत. ते पूर्ण झाले की मदत देण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे.

परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना वार्‍यावर न सोडता मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, नुकसानीचे पंचनामे वेगाने सुरु आहेत. या संदर्भात प्रशासनाला सूचना देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्यातील शेतकर्‍यांना पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी आतापर्यंत ४७०० कोटी रुपयांची वाढीव दराने मदत देण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततचा पाऊस आणि नुकसानीसाठीदेखील हेच निकष लागू करण्यात आले आहेत. एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुपटीने जास्त व दोनऐवजी तीन हेक्टर अशी वाढीव मदत दिली जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.


– मंत्रिमंडळ निर्णय-
१. ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजना
– राज्यातील आदिवासी वस्ती/वाडे/पाडे/समूह (क्लस्टर) यांचा विकास करण्याबाबत ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेतंर्गत हाती घ्यायची कामे, अंमलबजावणी यंत्रणा आणि इतर निकषात सुधारणा
– सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार २०२२-२३ या आर्थिक वर्षापासून ही योजना अधिक परिणामकारकपणे राबविणार
– २५० कोटी रुपयांची या आर्थिक वर्षासाठी तरतूद
– एकात्मिक विकासाचा दृष्टीकोन
– योजना आणखी समावेशक करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती
२. सपन मध्यम प्रकल्प, अचलपूरच्या४९५.२९ कोटी रुपयांच्या वाढीव खर्चास मंजुरी
– सपन मध्यम प्रकल्प, अचलपूर, जिल्हा अमरावतीच्या ४९५.२९ कोटी रुपयांच्या वाढीव खर्चास मंजुरी
– ३५ गावांतील ६१३४ हेक्टर क्षेत्राला सिंचनलाभ मिळणार
– भूजल आणि विहिरींच्या पाण्याच्या पातळीत सुद्धा वाढ
– १०५ गावात पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा शाश्वत जलस्त्रोत
– डिसेंबर २०२३ मध्ये काम पूर्ण करणार
३. राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य, पोषण मिशनच्या चौथ्या टप्प्यास मंजुरी
– २०२५ पर्यंतच्या कालावधीसाठी मंजुरी
– या चौथ्या टप्प्याच्या उद्दिष्टपूर्तीचा वेळोवेळी आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेत राज्यस्तरिय संनियंत्रण समिती
– ग्रामीण/आदिवासी भागात पोषण दर्जा सुधार, कुपोषण कमी करणे, महिला सक्षमीकरण इत्यादी क्षेत्रात काम करणार
४. ऑक्टोबरच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांनासुद्धा मदत करणार
– ऑक्टोबर २०२२ च्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांनासुद्धा मदत करण्याचा निर्णय
– तातडीने पंचनामे सादर करण्याचे निर्देश
– या शेतकर्‍यांनासुद्धा एनडीआरएफपेक्षा दुप्पट आणि ३ हेक्टर मर्यादेत मदत मिळणार
– राज्य सरकारचा मोठा निर्णय, यापूर्वी दिलेल्या ४७०० कोटी रुपयांपेक्षा ही अधिकची मदत!
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!