लवकरच मंत्रिमंडळ विस्तार, राज्यमंत्रीही घेणार शपथ; देवेंद्र फडणवीस यांची माहिती
मुंबई (प्राची कुलकर्णी) – अमरावती, विदर्भात प्रहार पक्षाचे नेते व आमदार बच्चू कडू हे उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक आमदार रवी राणा दाम्पत्याविरोधात आक्रमक झाले असताना, फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या लवकरच विस्ताराचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे मंत्रिपदाच्या अपेक्षेत असलेले बच्चू कडू यांच्यासह औरंगाबादचे आमदार संजय सिरसाठ यांच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आणि त्यात राज्यमंत्रीही शपथ घेणार असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले असले तरी, हा विस्तार नेमका कधी होणार हे स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, भाजपच्या वरिष्ठस्तरीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत फक्त फडणवीस हेच बोलू शकतात. तथापि, हा विस्तार झाला तर बुलढाण्यात चिखलीच्या आमदार श्वेता महाले पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल. तसेच, शिंदे गटात मुख्यमंत्री शिंदे यांनी ज्यांना शब्द दिला होता, त्यांचीही वर्णी लागेल. हे वाटपदेखील समसमानच होणार असल्याचे या सूत्राने स्पष्ट केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आता लवकरच होणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. गेल्या वेळी सर्व कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी पार पडला होता, येत्या विस्तारात राज्यमंत्र्यांनाही स्थान दिले जाणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. भाजपकडून या मंत्रिमंडळाच्या विस्तारात श्वेता महाले पाटील, संजय कुटे, नीतेश राणे, गोपीचंद पडळकर, गणेश नाईक यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिंदे गटाला अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला संधी मिळेल, अशी आशा बच्चू कडू यांना होती. परंतु, तसे झाले नाही. त्याबद्दल ते प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे आता बच्चू कडू यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे.
– मंत्रिमंडळ विस्ताराची संभाव्य यादी –
- प्रवीण दरेकर
- संजय कुटे
- विजयकुमार देशमुख किंवा सुभाष देशमुख
- गणेश नाईक
- संभाजी पाटील निलंगेकर
- प्रसाद लाड
- योगेश सागर
- देवयानी फरांदे
- माधुरी मिसाळ किंवा श्वेता महाले पाटील
- जयकुमार गोरे
- प्रशांत ठाकूर
- मदन येरावार
- महेश लांडगे किंवा राहुल कुल
- नीलय नाईक
- गोपीचंद पडळकर
- नीतेश राणे