जिल्ह्यातील अन्न व भेसळ प्रतिबंधक खाते झोपले; मेरा बुद्रूकमध्ये खुलेआम भेसळसदृश खुल्या तेलाची स्वस्तात विक्री!
– गोरगरीबांच्या माथी स्वस्तात भेसळसदृश तेल मारले जात असताना अन्न व भेसळ प्रतिबंधक अधिकारी करतात काय?
चिखली (एकनाथ माळेकर) – खुले तेल विकण्यास केंद्र सरकारने सक्त मनाई केली असताना व तसा कायदाही असताना, हा कायदा बुलढाणा जिल्ह्यातील अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी धाब्यावर बसवलेला आहे. चिखली तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मेरा बुद्रूक येथे खुलेआम खुले तेल मिळत असून, तेही तब्बल १२० रुपये किलो दराने विकले जात आहे. होलसेल मार्केटमध्ये किमान १३७ रुपये तेलाचे दर असताना, इतक्या स्वस्तात तेल विकणारे हे भेसळसदृश तेल विकत असून, त्यांना अन्न व भेसळ प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्यांचा वरदहस्त असल्याचे दिसून येत आहे. या भेसळसदृश तेलामुळे ग्रामीण भागातील गोरगरीबांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील अधिकारी मलिदा वैगरे खाऊन कारवाई करत नाहीत का, असा संशय निर्माण झाला असून, तसे असेल तर अमरावती विभागीय आयुक्तांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी पुढे आली आहे. ऐन दिवाळीत या भेसळसदृश तेलाची या गावात मोठ्या प्रमाणात विक्री होत असून, स्वस्तात मिळते म्हणून गोरगरीब ग्रामस्थ हे तेल विकत घेत असल्याचे दिसून येत आहे.
मेरा बुद्रूक गावात आणि दिवाळीच्या सणासुदीला काही दुकानांमध्ये१२० रुपये किलो दराने खाद्यतेल तर काही दुकानात १४० रुपये किलो दराने तेल मिळत आहे. यातील गौडबंगाल काय असावे म्हणून एका किराणा दुकानदाराशी संपर्क केला असता, त्यांनी स्वस्तात विकले जाणारे तेल भेसळसदृश असावे, असा संशय व्यक्त केला आहे. सुट्या तेलाच्या विक्रीला केंद्र सरकारने बंदी घातली आहे. तरीसुद्धा मेरा बुद्रुक येथे दिवाळीच्या सणात सुटे तेल मिळत आहे. त्यामुळे हे भेसळसदृश तेल विकणार्या किराणा दुकानांवर ग्राहकांची भरपूर गर्दी दिसून येत आहे. खाद्य तेलामध्ये मोठी भाववाढ झाल्याने व स्वस्तात तेल मिळत असल्याने गोरगरीब ग्रामस्थही हे तेल खरेदी करत असून, त्यांना ते भेसळसदृश असल्याची काहीही कल्पना नाही. वर्षभरात सर्वात मोठा सण म्हणून दिवाळी सणाकडे पाहिल्या जाते. परंतु ही दिवाळीच्या सणातसुद्धा महागाई कमी होण्याचे नाव नाही. या सणाला भरपूर खाद्यपदार्थ व मिठाई तयार केली जाते. त्यामुळे किराणा वाणसमानाचीही खरेदी मोठ्या प्रमाणात होते. परंतु मेरा बुद्रुक हे जवळपास १५ हजार लोकवस्ती असलेले गाव असून, जवळपासचे पाच ते सहा खेडे या गावाला जोडले गेले आहेत. या गावांतून किराणा माल खरेदीसाठी ग्रामस्थ मेरा बुद्रूक येथे येतात. त्यांच्याच माथी हे भेसळसदृश तेल मारले जात आहे. या गावातील काही दुकानांमध्ये १४० रुपये किलो तेल आहे, तर काही दुकानात १२० रुपयाने दराने तेल विकले जात आहे. त्यामुळे ग्राहकांना नेमके कोणते तेल खरेदी करावे, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
या संदर्भात ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने मेरा बुद्रूक येथील येथील मोहन किराणा यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, की आम्ही होलसेल मार्वेâटमधून १३७ रुपये दराने तेल खरेदी करत आहोत. आणि, त्यावर तीन रुपये नफा घेऊन ते १४० रुपये किलोने ग्राहकांना विकत आहोत. परंतु आमच्या गावांमध्ये काही दुकानांमध्ये १२० रुपये किलो तेल मिळते. त्या तेलाचा दर्जा, वैधता याची काहीही खात्री नाही. त्यामुळे ते गोरगरीबांच्या आरोग्याला घातक असावे, असा संशय आहे. याबाबत अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाने तातडीने तपासणी करून हे तेल ताब्यात घेण्याची गरज आहे, असेही त्यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.
मुळात प्रश्न असा आहे, की जिल्ह्यात खुलेआम खुले तेल विक्री होत असताना बुलढाणा जिल्ह्याचा अन्न व भेसळ प्रतिबंधक विभाग काय काम करत आहे. त्यांना मेरा बुद्रूक येथील भेसळसदृश तेलविक्री दिसत नाही का, बुलढाण्याचे अन्न व भेसळ प्रतिबंधक अधिकारी केदार हे तातडीने कारवाई करणार आहेत की नाही, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
—————–