‘गुवाहाटीतील खोके’प्रकरणावरून शिंदे-फडणवीस गटाचे दोन आमदार भिडले!
– रवी राणांविरोधात बच्चू कडूंची पोलिसांत तक्रार दाखल
– १ तारखेपर्यंत पैसे घेतल्याचे पुरावे द्यावे, नाही तर रवी राणांना हिजडा घोषित करणार – बच्चू कडू
अमरावती (जिल्हा प्रतिनिधी) – गुवाहाटीतील खोके प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गटाचे आमदार भिडले असून, त्यांच्यातील शाब्दिकयुद्ध आता कायदेशीर कारवाईवर येऊन ठेपले आहे. आमदार बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांच्या किराणा वाटपावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यावर आ. राणा यांनी बदनामी केल्याचा आरोप करत, बच्चू कडू यांनी आ. राणांविरोधात अमरावतीच्या राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. एका बापाची अवलाद असेल तर रवी राणा यांनी माझ्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे द्यावे, असे आव्हान आमदार बच्चू कडू यांनी राणा यांना दिले आहे. १ नोव्हेंबर पर्यंत अमरावती येथील टाऊन हॉल याठिकाणी त्यांनी यावे आणि पुरावे द्यावे. जर पुरावे दिले तर मी त्यांच्या घरी भांडे घासेन, आणि पुरावे दिले नाहीत तर त्यांना कायमचा हिजडा घोषीत करणार, असे आमदार बच्चू कडू यांनी ठणकावले आहे.
शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन करोडो रुपये लाटले, असा आरोप रवी राणा यांनी केला होता. या आरोपांवरून बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. दोघेही एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. आमदार रवी राणा यांनी माझी बदनामी केली आहे. २०-२० वर्षे आम्ही राजकीय करिअर उभे करायला खर्च केले आहे. मी पैसे घेऊन जर गुवाहाटीला गेलो असेल तर पैसे देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदेजी यांनी दिले असतील. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनादेखील नोटीस पाठवणार आहोत की, तुम्ही पैसे दिले असेल तर स्पष्ट करा, असे बच्चू कडू म्हणाले. गुवाहाटीला जाऊन पैसे घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला. तो त्यांनी सिद्ध करावा. सिद्ध झाला तर रवी राणा यांच्या घरी भांडी घासेल, नाहीतर त्याला कायमचा हिजडा घोषित करू, अशी आक्षेपार्ह टीका प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी केली आहे.
————–