BULDHANAChikhali

वाघाळा-शिवनी देशमुख रस्ता उखडला!

– बांधकाम खात्याने तातडीने रस्ता दुरुस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

चिखली/सिंदखेडराजा (एकनाथ माळेकर) – वाघाळा ते शिवनी देशमुख या रोडचे अतोनात हाल झाले असून, हा रस्ता जागोजागी उखडला आहे. वाघाळा गावातून जालना, औरंगाबाद येथे जाण्यासाठी हाच रस्ता आहे. त्यामुळे महसूल, शिक्षण, दवाखाना, किंवा खरेदीसाठी जाताना याच रोडने जावे लागते. परंतु, रस्ता पूर्णपणे उखडला असून, त्यामुळे एसटी सेवादेखील बंद पडली आहे. परिणामी, विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद झाले असून, त्यांच्या आयुष्याचे मोठे नुकसान होत आहे. तसेच, वृद्ध किंवा रोगी यांना तर मरण्यासाठीच सोडून देण्याची वेळ आली आहे. तरी बांधकाम खात्याने हा रोड तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी वाघाळा ग्रामस्थ करत आहेत. अन्यथा, तीव्र स्वरुपाच्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

सिंदखेडाराजा तालुक्यापासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघाळा गावातील विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षणासाठी मलकापूर तसेच सिंदखेडराजा तालुक्याच्या ठिकाणी जातात. परंतु वाघाळा ते शिवनी देशमुख हा रोड रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, अशी अवस्था झालेला आहे. या रोडमुळे शालेय शालेय विद्यार्थ्यांचे खूप मोठे नुकसान होत आहे. वाघाळासह परिसरातील गावांतील विद्यार्थ्यांवर केवळ रस्त्याअभावी शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. या रस्त्यावरून काही दिवसापासून सिडको ते वाघाळा ही बस येत होती. परंतु, जसा पावसाळा सुरू झाला, तशी बस येणे बंद झाले. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना सिंदखेडराजा, जालना, औरंगाबाद येथे शिक्षणासाठी जाण्यासाठी खूप भुर्दंड पडत आहे. तसेच गावातील लोकांना दवाखाना किंवा वैद्यकीय उपचारासाठी जालना, औरंगाबादला जावे लागते. परंतु सिडको-वाघाळा बस रोडच्या कारणामुळे बंद करण्यात आल्याने रुग्ण, महिला, विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी यांचे अतोनात हाल होत आहे. शालेय विद्यार्थ्यांना व वृद्ध रुग्णांना मोठा त्रास व भुर्दंड सोसावा लागत आहे. आज शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटाशी लढत असताना, खराब रोडमुळे त्यांना आर्थिक बाबीशीसुद्धा सामना करावा लागत आहे. तीन महिन्यापासून बस बंद आहे, त्यामुळे वाघाळा येथील ग्रामस्थांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दोन वर्षांपूर्वी मलकापूर येथील ठेकेदाराने या रस्त्याची डागडुजी केली होती. परंतु, ते काम चांगले न झाल्याने हा रस्ता पुन्हा उखडला आहे. या रस्त्याने जालना किंवा औरंगाबाद येथे महसूल, किंवा कोणत्याही कामाकरिता जाताना ग्रामस्थांची हाडे खिळखिळी होत असून, अनेकांना मणक्यांचे आजार जडलेले आहेत. तरी संबंधित विभागाने या बाबीकडे लक्ष देऊन, या रोडचे तातडीने काम करावे, अशी वाघाळा ग्रामस्थांची मागणी आहे.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!