दिव्यांग कल्याण निधी न दिल्याचा आरोप करीत अपंग व्यक्तीचा मृतदेह नगरपंचायत ठेवत केले आंदोलन
कर्जत (प्रतिनिधी) :- अपंग व्यक्तीच्या हक्काचा निधी नगर पंचायत संबंधितास देत नाही, असा आरोप करत एकनाथ भानुदास पवार या अपंग व्यक्तीचे निधन झाल्यानंतर संबंधीत व्यक्तीचा मृतदेह कर्जत नगर पंचायत कार्यालयाच्या दारात आणून मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्याविरुद्ध तक्रार करत कारवाईची मागणी करण्यात आली. नगर पंचायतीच्या विरोधीपक्ष नेत्या अश्विनी दळवी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
कर्जत नगरपंचायतच्या वार्ड क्रमांक चार मध्ये रहिवासी असलेले व्यक्ती एकनाथ भानुदास पवार हे अपंग होते. गेली अनेक दिवसांपासून ते आजारी होते, त्यांना आर्थिक मदतीची गरज होती, नगर पंचायतच्या अपंग कल्याण निधीतून आर्थिक मदत मिळावी म्हणून त्यांनी अर्ज दिला होता. या अर्जबाबत अनेकदा पाठपुरावा करून ही नगर पंचायत कडून त्यास कोणताही प्रतिसाद दिला गेला नाही. मात्र आज या व्यक्तीचा मृत्यू झाला, शवविच्छेदना नंतर सदर मृतदेह कर्जत नगर पंचायत कार्यालयासमोर आणून आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले, नगर पंचायतीच्या विरोधीपक्ष नेत्या अश्विनी दळवी गायकवाड, विनोद दळवी, अण्णा म्हेत्रे, ज्ञानदेव लष्कर, आदित्य क्षीरसागर, आदीं सह अनेक जण सहभागी झाले होते.
यावेळी या सर्वानी नगर पंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्यावर आक्षेप घेत सरकारने अपंग कल्याण निधी हा तीन टक्के स्वतंत्र ठेवलेला आहे, पण हा निधी नगरपंचायतने खर्चच केलेला नसल्याचे म्हटले. यावेळी प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले, तहसीलदार नानासाहेब आगळे, यांनी येथे भेट देऊन चर्चा केली, संबंधित व्यक्ती कुटुंब प्रमुख असल्याने त्याच्या जाण्याने निराधार झालेल्या कुटुंबाला मदत मिळण्यासाठी सर्वतोपरी मदत मिळावी व मुख्याधिकारी जाधव यांचे वर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. नगर पंचयतच्या वतीने संतोष समुद्र उपस्थित होते, शेवटी नगरसेवक नामदेव राऊत, नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल यांनी याठिकाणी भेट दिली.