हिवरा आश्रम (जिल्हा बुलढाणा)/ संतोष थोरहाते
हिवरा आश्रम,ता.22ः- मनुष्याचे रूप धारण करणाऱ्या मानवी ईश्वराची तसेच ईश्वराच्या विश्वात्मक रूपाची पुजा करणारे व मानवी समूहाला दैवी जीवनाचा मार्ग दाखविणारे निष्काम कर्मयोगी संत प. पू. शुकदास महाराज हे आरोग्य सेवेतील महान विभूती होते. त्यांनी स्थापन केलेला विवेकानंद आश्रम ग्रामीण भागातील दीन, दुःखीतांचे सेवा करण्याचे उदिष्ट पूर्णत्वास नेत आहे. यावर्षीपासून संस्थेच्या शैक्षणिक दालनात विवेकानंद नर्सिंग महाविद्यालयाच्या रूपाने नवीन विद्याशाखा सुरू होते आहे. विज्ञान आणि आध्यात्माचा, ज्ञान आणि विज्ञानाचा अनोखा संगम असलेले हिवरा आश्रम शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थ्यांच्या गुरूकुल जीवन पध्दतीने सर्वदूर प्रसिध्द झालेले आहे. संस्थेची ही सर्व प्रगती म्हणजे निष्काम कर्मयोगी संत प. पू. शुकदास महाराजांंच्या खडतर तपश्चर्येचे व साधनेचे फळ आहे असे विचार विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी यांनी आश्रमात आयोजित केलेल्या धन्वंतरी पुजन कार्यक्रमात व्यक्त केले.
या जगातून व्देष, इर्षा, दैन्य व दुःख नष्ट व्हावेत तसेच प्रत्येकाला निरामय आरोग्य लाभावे त्यासाठी प्रत्येकाने सदविचारांची एक तरी पणती या दिपोत्सवात लावावी. मनातील काळोख दूर झाल्यास त्या चैतन्यमय ईश्वराचे दर्शन आपल्याला घडते असेही ते पुढे म्हणाले. विवेकानंद आश्रमाच्या कॅम्पसमधून शिक्षण घेवून बाहेर पडणारा तरूण स्वत्वाची जाण असलेला व स्वधर्माचे पालन करण्यास तत्पर असलेला असावा यासाठी संस्थेने सर्वोतोपरी प्रयत्नशील असावे हीच भूमिका घेवून सर्वांनी कार्यरत असावे अशी भावना आर.बी.मालपाणी यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली.
कार्यक्रमाची सुरूवात परिसराची स्वच्छता व रूग्ण तपासणी करून करण्यात आली. आश्रमातील धन्वंतरीचे पुजनासाठी परिसरातील अनेक डॉक्टर्स उपस्थित होते. याप्रसंगी विवेकानंद आश्रमाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.गजानन गिऱ्हे यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. धन्वंतरी देवतेची उपासना म्हणजे स्वतःच्या उत्तम आरोग्याची, सत्वशील जीवनाची व दीर्घायाष्यासाठी केलेली तयारी आहे. प्रत्येकाने आहार, विहारावर नियंत्रण व आरोग्यदायी जीवनशैलीचा स्विकार केल्यास उत्तम आरोग्य राखता येईल असे विचार त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला आश्रमाचे पदाधिकारी व डॉ.जगदिश सांबपूरे,डॉ.महेश रोकडे,डॉ.सचिन काळे,डॉ.राहूल आव्हाळे, सुनिल ठेंग हे उपस्थित होते.