चिखली (एकनाथ माळेकर) – बुलढाणा येथील एल्गार मोर्चाचे शेतकर्यांना निमंत्रण देण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर हे आज सायंकाळी साडेसहा वाजता अंत्री खेडेकर येथे येणार असून, त्यानिमित्त भव्य सभा होणार आहे. यावेळी परतीच्या पावसाने झालेले नुकसान, सोयाबीन, कापूस यांचा कोसळलेला भाव व राज्य आणि केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर तुपकर हे जोरदार टीकास्त्र डागणार आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परतीच्या पावसाने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामधे सोयाबीन, कापूस, मका इत्यादी पिके संपूर्णतः नष्ट झाली आहे. सरकार फक्त कागदी घोडे नाचवत आहे. सोयाबीन, कापसाचे कमी झालेले भाव आणि अतिवृष्टीने झालेले नुकसान, यामुळे शेतकर्यांच्या पदरी निराशा पडली आहे. शेतकर्यांची दिवाळी ही अंधारात जाईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्यावर्षी सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात जो मोर्चा काढला आणि त्यानंतर ४ते ५ दिवस अन्नत्याग आंदोलनामुळे त्याची दखल राज्य सरकार आणि केंद्र सरकारने घेतली, आणि सोयाबीन कापसाचे भाव वाढण्यास मदत झाली. तशीच परिस्थिती किंबहुना त्या पेक्षाही जास्त नुकसान यावेळी झाले आहे. म्हणून, शेतकर्यांनी पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून आणि शेतकरी म्हणून एकत्रित येऊ, अशी भूमिका घेणे गरजेचे आहे. म्हणून शेतकर्यांना धीर देण्यासाठी राज्याचे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात दि.०६ नोव्हेंबर रोजी बुलडाणा शहरामध्ये मोठी देवी ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. आणि याचे निमंत्रण देण्यासाठी आज दि.२२/१०/२०२२ रोजी चिखली तालुक्याचा संवाद दौरा आहे आणि या दौर्याच्या निमित्ताने अंत्री खेडेकर येथे सायंकाळी ६;३० जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे, तरी सर्व शेतकर्यांनी जात, धर्म, पंथ, पक्ष, संघटना बाजूला ठेवून शेतकरी हिच आपली जात म्हणून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, नितीन राजपूत, भारत वाघमारे, अमोल मोरे यांनी केली आहे.