चिखली (महेंद्र हिवाळे) – चिखली शहरासह तालुक्यात काल (दि.२०) आणि काही ठिकाणी आजदेखील झालेल्या परतीच्या ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार उडालेला असून, शेतात तळे साचले आहे. त्यामुळे सोयाबीन, कपाशी, तूर, भुईमूग या पिकांची नासाडी गेली असून, खरिपाची सर्व पिके वाया गेली आहेत. त्यामुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले असून, ऐन सणासुदीत शेतकरी उदध्वस्त झालेला आहे.
काल आणि आजच्या पावसाचा अंत्री कोळी, वाघापूर, साकेगाव, माळशेंबा, खोर, रायपूर, सावरगाव डुकरे, भोगावती, तसेच चिखली तालुक्यातील बहुतांश गावांना जोरदार फटका बसलेला आहे. २० ऑक्टोबर दुपारी २ वाजेपासून झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने शेतीचे अतोनात नुकसान झाले. मागील काही दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे शेतीला जोरदार फटका बसला आहे. या पावसाने शेतीला तलावाचे स्वरूप आले असून, शेतकर्यांचे उभे सोयाबीन पिक व इतर पिके जसे की तूर, भुईमूग व कपासी ही पिके पावसामुळे वाहून गेली आहेत.
ज्या शेतकर्यांनी सोयाबीनची सुडी घातली होती, त्यांच्या सुडीमध्ये अजूनही पाणी साचून आहे. नद्या लगतचे, तसेच नाल्या लगतच्या शेतांमधील सोयाबीनच्या सुड्या वाहून गेल्या आहेत. दुपारी शेतामध्ये असणारे शेतकरी आपल्या उघड्या डोळ्यांनी सुड्या व तसेच उभ्या पिकांचे नुकसान पाहून अस्मानी संकटाला दोष देत वर्षभर केलेल्या कष्टाचे हेच फळ का? असे हताश उदगार काढत होते. राज्य सरकारने पंचनाम्याचे सोपस्कार न करता, त्वरित चिखली तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा, व शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी विनवणी शेतकरी सरकारकडे करत आहेत.