चिखली (विशेष प्रतिनिधी) – चिखली तालुक्यातील इसरूळ येथील जिल्हा परिषदेच्या मराठी उच्च प्राथमिक शाळेला अखेर ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त झाले असून, त्याबद्दल ग्रामस्थांसह शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच, उपसरपंच यांच्यासह सदस्यांचे तालुक्यात अभिनंदन होत आहे. ही शाळा ग्रामस्थांच्या सहकार्यातून ‘आयएसओ’ होत असल्याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने सर्वप्रथम राज्यस्तरावर वृत्त प्रसिद्ध केले होते. लोकसहभागातून या शाळेचा कायापालट झाला असून, गुणवत्तापूर्ण शिक्षणाने शाळेचा लौकिक वाढलेला आहे. त्यातच आता ‘आयएसओ’ मानांकनाने शाळेच्या व गावाच्याही शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या यशाबद्दल चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील, माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते आ. राजेंद्र शिंगणे यांनी या यशाबद्दल इसरूळ गावाचे अभिनंदन केलेले आहे.
इसरूळ येथील गावकर्यांच्या सहभागाने तथा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य तसेच सरपंच, उपसरपंच तथा सर्व सदस्य गण यांच्या प्रतिसादातून आणि ग्रामपंचायत सचिव इसरुळ व गावातील प्रतिष्ठित नागरिक, पदाधिकारी यांच्या सहकार्याने तसेच, शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांच्या अथक प्रयत्नांतून शाळेला आज आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. याचा आज गावाला सार्थ अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. शाळेला गावाचा आधार व गावाला शाळेचा सार्थ अभिमान वाटावा, अशा प्रकारे शाळेची वाटचाल सुरु आहे. या वाटचालीची सुरुवात याआगोदर येथे कार्यरत मुख्याध्यापक व सर्व शिक्षक ज्यांनी या शाळेमध्ये उल्लेखनीय कार्य करून केलेली आहे. त्यानंतर २०१८ ला सर्व शिक्षकांच्या बदल्या होऊन सर्व नवीन शिक्षक शाळेला मिळाले, आणि शाळा ‘आयएसओ’ करण्याचे आणि जेथे विद्यार्थी शिकतो तेथील वातावरण आनंददायी, स्वच्छ व सुंदर आणि आल्हाददायक कसे होईल, आणि मुले चांगली शिकतील, यासाठी सर्व शिक्षकांनी नियोजन करून कार्यास सुरुवात केली आणि गावकर्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. या यशाबद्दल आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्याहस्ते गावकरी, पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक यांचा सन्मानदेखील झाला असून, सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून साध्य झालेल्या या यशाची इतर गावातील शाळादेखील प्रेरणा घेत आहेत.