बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांची आज बदली झाली असून, त्यांच्या जागेवर सारंग आवाड हे पोलिस अधीक्षक म्हणून आले आहेत. ते यापूर्वी नागपूर शहर येथे पोलिस उपायुक्त होते. चावरिया यांना अद्याप शासनाने नियुक्तीचे ठिकाण दिले नसून, त्याबाबत नंतर स्वतंत्र आदेश जारी केला जाणार आहे.
सारंग आवाड यांनी पुण्यातील वाहतूक शाखेत पोलिस उपायुक्त म्हणून काम केलेले आहे. त्यावेळी त्यांनी वाहतुकीला लावलेली शिस्त वाखाणली गेली होती. राज्य पोलिस दलात ते १९९६ मध्ये पोलिस उपाधीक्षक म्हणून भरती झाले होते. त्यांनी त्यांच्या सेवा काळात जळगाव, इस्लामपूर, वाळवा या ठिकाणी उपाधीक्षक म्हणून काम केलेले आहे. राज्य सरकारने त्यांचा भारतीय पोलिस सेवेत (आयपीएस) समावेश केला होता. नागपूर शहरात ते पोलिस उपायुक्त असताना, आता त्यांची बुलढाणा येथे पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.
प्रामाणिक, प्रयोगशील व कठोर शिस्तीचे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. आवाड हे बुलढाण्यात आल्याने अवैध प्रवासी वाहतूकवाल्यांनी आपली वाहने आता पाव्हण्यारावळ्यांकडे पाठविण्याची सोय करावी, कारण त्यांची ही दुकानदारी निश्चित बंद होणार आहे.