चिखली (विशेष प्रतिनिधी) – मुसळधार व संततधार पावसाने पिके संपूर्णपणे नष्ट झाल्याचे ढळढळीत दिसत असूनही प्रशासन पंचनामे का करत नाही? अजून कोणता पुरावा द्यायचा नुकसानीचा? असा जळजळीत सवाल चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी चिखलीच्या तहसीलदारांना केला. तसेच, सरसकट पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करण्याच्या सूचना तहसीलदारांना केल्या.
मागील अनेक दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. कधी वादळी तर कधी अवकाळी पावसाने नदी, नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने काठावरचे सोयाबीन व इतर पिके तर कधीचीच नष्ट झाली. सोयाबीन काढणीची वेळ टळून गेली, पण पाऊस सुरू असल्याने शेतकर्यांना सोयाबीन सोंगता येत नाही. ज्यांनी सोयाबीन सोंगले ते सोयाबीन सडले. ज्या सोयाबीनची काढणी झाली नाही ते पीक पाण्यात उभे आहे. काढणी झालेल्या आणि उभ्या अशा दोन्ही प्रकारच्या सोयाबीनला कोंब फुटल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यातच ‘पंचनामे करा, आर्थिक मदत द्या’, अशी मागणी शेतकरी करत आहेत; पण प्रशासन पंचनामे करीत नाही. चिखलीच्या तहसीलदारांनी तर तालुक्यात अतिवृष्टी नाही म्हणून पंचनामे करणार नाही, अशी शेतकरीविरोधी भूमिका घेतली होती. गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार आणि संततधार पावसाने कहर केला असून, उरली-सुरली सर्व पिके हातातून गेली आहेत. प्रशासनाला हे दिसत आहे. तरीही पंचनामे करण्यासाठी प्रशासन कुणाची वाट पाहत आहे? अजून कोणता पुरावा द्यायचा नुकसानीचा? असा संतप्त सवाल आमदारांनी चिखलीच्या तहसीलदारांना केला.
आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी १९ ऑक्टोबर रोजी रायपूर, धाड, मासरुळ, म्हसला, पाडळी या महसुली मंडळात व परिसरात अतिप्रचंड पावसाने झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी रुईखेड, मायंबा, चांडोळ, कुंबेफळ, टाकली, म्हसला बु. या गावांमध्ये जाऊन केली. या वेळी बुलढाण्याचे तहसीलदार रुपेश खंदारे, देविदास पाटील जाधव जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, संदीप उगले पंचायत समिती सदस्य, योगेश राजपूत तालुका अध्यक्ष युवा मोर्चा, विष्णु वाघ तालुका उपाध्यक्ष भाजपा, विष्णु उगले सरपंच, राजू चांदा, गजानन देशमुख, गजानन सपकाळ, सखाराम नेमाडे, पुरूषोत्तम भोंडे, विशाल गाजगणे, कौतिकराव ओळेकर, साहेबराव उगले, गणेश सोमुने, शिवाजी उगले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
चिखलीच्या तहसीलदारांची शक्य तितक्या लवकर बदली करा!
चिखली तालुक्यात शेतीपिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. तरीही तहसील प्रशासन ढिम्म आहे. अतिवृष्टीचे निकष बदलले तरी तहसीलदार शेतकर्यांना दिलासा देण्यास तयार नाहीत. शेतकरीप्रश्नी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने वारंवार आवाज उठविला. तहसीलदारांना फोनही केले. परंतु, ‘पदाच्या गूर्मीत असलेले तहसीलदार फोनही उचलत नाहीत’. त्यामुळे तहसीलदारांची तातडीने बदली करावी व लोकाभिमुख तहसीलदार चिखलीला द्यावेत, अशी मागणी लवकरच ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली जाणार आहे. इतर गंभीर प्रकाराबाबतही या दोन नेत्यांना अवगत केले जाणार आहे.
————–