खामगाव ते जालना रेल्वे मार्गाविषयी संभ्रम नसावाच, आपण खासदार झाल्यापासूनच कामाला गती – खा.जाधव
– शिवसेना (शिंदे गट) नेते खा. प्रतापराव जाधव यांची माहिती
हिवरा आश्रम, ता. मेहकर (सतिश काळे) – रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जरी ते विधान केले असले तरी, ते निषेध करण्यासारखे नाही. कारण खामगाव ते जालना रेल्वेमार्गाचे नियोजनात्मक काम अंतिम टप्प्यात असून, डीपीआर मंजूर होताच राज्य शासनाचा ५० टक्के निधीही त्याला मिळू शकतो. आधी केवळ या रेल्वेमार्गाच्या आश्वासनावर निवडणुका लढल्या गेल्या, पण आपण २००९ ला खासदार झाल्यापासूनच खर्याअर्थाने या कामाची सुरुवात झाल्याचे खा.प्रतापराव जाधव यांनी सांगितले.
ना.दानवे यांनी एका सभेत खामगाव ते जालना रेल्वेमार्गात खोडा घालण्याचे केलेले विधान सोशल मीडिया व देशोन्नतीमध्ये आल्यानंतर, त्यावर भूमिका स्पष्ट करण्यासाठी खा.प्रतापराव जाधव यांनी काल पत्रकार परिषद घेतली हाेती. त्यानंतर त्यांनी या विषयावर ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शीदेखील संवाद साधला. खा.जाधव पुढे म्हणाले की, केंद्र व राज्याच्या प्रत्येकी ५० टक्के निधीवर खामगांव- जालना रेल्वे मार्ग पुर्णत्वास जाण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या पुंजीनिवेश कार्यक्रमात या मार्गाची अधिकृत घोषणा झाली आहे. हा रेल्वेमार्ग अर्थसंकल्पात डीपीआरनुसार मंजूर झाला असून या मार्गाचे २०१० ला प्राथमिक सर्वेक्षण झाले. मार्गातील उत्पादन, मालवाहतुक आणि प्रवासी तसेच जालना जिल्ह्यातील ४ व बुलढाणा जिल्ह्यातील १३ असे एकूण १७ रेल्वेस्टेशन या मार्गावर होणार आहे. त्यासोबतच नदीजोड प्रकल्प वैनगंगा ते पैनगंगा शिवाय आकोट ते खंडवा संग्रामपूर, जळगांव जामोद मधून रेल्वेलाईन होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी एका कार्यक्रमात खामगांव- जालना या मार्गात जालना जिल्ह्यातील एक रेल्वे स्टेशन व १२ कि.मी. अंतर असल्याने जालना- जळगांव रेल्वेमार्ग सोयीचा असल्याचे जाहीर कार्यक्रमात भाषणाच्या ओघात ते बोलले. प्रत्येक लोकप्रतिनिधी आपल्या मतदार संघात विकासकामे आणण्यासाठी प्रयत्न करीत असतो. या संदर्भात रेल्वे संघर्ष समिती व अनेकांची भ्रमणध्वनीवर फोन आले. त्यामुळे पत्रकार परिषद घ्यावी लागली. गेल्या १०० वर्षापूर्वी हा मार्ग इंग्रजांच्या काळात सर्व्हेक्षण होऊन रखडला होता. २००९ मध्ये खासदार झाल्यावर २०१० ला प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले. २ दिवस सर्व्हेक्षण पथकाने जालना, देऊळगांवराजा, सिंदखेडराजा, मेहकर, चिखली, खामगांव तसेच मार्गावरील मोठ्या गावचे उत्पादन मालवाहतुक, प्रवासी या संदर्भात सर्व्हे केला. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल, ना.नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर रेल्वेमंत्रालयाच्या पुंजीनिवेश कार्यक्रमात या मार्गाची घोषणा होऊन केंद्र व राज्य सरकारच्या प्रत्येकी ५० टक्के निधीनुसार अंदाजे एकूण ५ हजार कोटी रूपयांचा खर्च लागणार आहे.
रेल्वेमार्ग करण्यासाठी कोरोडो रूपयांचा निधी लागत असल्यामुळे अनेक अडचणी या मार्गात येत आहेत. जालना ते जळगांव हा रेल्वेमार्ग रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नाने प्रस्तावित करण्यात आला आहे. परंतु खामगांव जालनाची यापूर्वीच घोषणा झाली असल्याचे ते म्हणाले. जालना ते खामगाव, नियोजीत रेल्वेमार्गावर अशी असतील, १७ रेल्वेस्टेशन या मार्गाच्या अंतिम लाईन सर्व्हेक्षणानुसार जालना जिल्ह्यातील चार गावात रेल्वेस्टेशन होणार आहेत. तर बुलडाणा जिल्ह्यातील १३ गावांमध्ये रेल्वे स्टेशन नियाेजित आहे. त्यामध्ये जालना, कचरीवाडी, रंगमुर्ती, नाव्हा तसेच बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगांवराजा, सिंदखेडराजा, जळगांव रोड, देऊळगांवमही, अंढेरा, मेरा, चिखली, दहीगाव, अमडापूर, उदयनगर, पाळा, जळका तेली, नवीन खामगांव असे स्टेशन होणार असल्याची माहिती यावेळी खा.प्रतापराव जाधव यांनी दिली.
—————