– १० दिवसांपासून शिक्षक उन, वारा, पावसात ठाण मांडून बसलेले!
मुंबई (प्राची कुलकर्णी) – राज्यातील ६० हजार शिक्षकांना १०० टक्के अनुदान द्यावे, या मागणीसाठी शिक्षक समन्वय संघाच्यावतीने सोमवारपासून (दि.१०) मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन सुरु असून, या आंदोलनाची धग आता राज्य सरकारपर्यंत पोहोचली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आंदोलक शिक्षकांशी चर्चा करण्यासाठी येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर, आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीतर आम्ही आझाद मैदान सोडणार नाही, असा निर्वाणीचा इशारा शिक्षकांनी सरकारला दिला असल्याने, या शिक्षकांची दिवाळी आझाद मैदानातच जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दिवाळीच्या तोंडावर राज्यभरातील शिक्षकांनी मुंबईच्या आझाद मैदानात महाएल्गार आंदोलन सुरु केले आहे. राज्यात अंशतः अनुदानित, विनाअनुदानित व अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांवर हजारो शिक्षक गेल्या २० वर्षांपासून ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. या मध्ये काही माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे २० ते ४० टक्के अनुदानावर वेतन घेत आहेत. तर काही अघोषित आणि विनाअनुदानित संस्थेकडून देण्यात येणार्या तुटपुंज्या पगारावर काम करत आहेत. दिवसेंदिवस वाढणारी महागाई, व उदरनिर्वाहासाठी लागणारा खर्च पाहाता, या तुटपुंज्या पगारात घर कसे चालवावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आर्थिक विवंचनेतून अनेक शिक्षकांनी आत्महत्यादेखील केल्या आहेत. तेव्हा सर्व शिक्षकांना १०० टक्के अनुदान द्यावे, या मागणीसाठी शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वात राज्यभरातील सर्व शिक्षक संघटनांनी आझाद मैदानावर महाएल्गार धरणे आंदोलन सुरु केले आहे.
गेले १० दिवस शिक्षक मैदानावर ठाण मांडून बसले असून, राज्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शिक्षकांच्या मागण्या जाणून घेतल्या. याप्रश्नी शिक्षकांचे प्रश्न सरकारकडे लावून धरू, असे आश्वासन त्यांनी दिले. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही याप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिक्षकांचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस हे शिक्षकांसोबत चर्चेसाठी आझाद मैदानावर येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्य सरकारने या शिक्षकांच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर, राज्यभरातून आलेल्या या शिक्षकांची दिवाळी आझाद मैदानावरच जाण्याची भीती निर्माण झाली आहे.