लोणार (विनोद पाटील तेजनकर) – नाशिक अपघाताच्या स्मृती अजूनही कायम असतानाच, यवतमाळहून मुंबईला जाणार्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसला वडगाव तेजनजवळील टोल नाक्यावर जोरदार अपघात झाला. या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने जीवितहानी झाली नाही. टोलनाका अरुंद असल्याने व बस वेगात असल्याने ती चालकाच्या बाजूने टोल नाक्याला घासली व सरळ शेतात घुसली. या अपघातात गाडीचे टायर फुटले, प्रवाशांचे नशीब बलवत्तर म्हणून डिझेलची टाकी फुटली नाही, नाही तर नाशिक दुर्घटनेची पुनर्रावृत्ती झाली असती. ही घटना काल रात्री १० वाजेच्या सुमारास घडली.
सविस्तर असे, की यवतमाळकडून मुंबईकडे जाणारी लक्झरी बस (क्रमांक एमएच ४० एटी ०१८७) ही वडगाव तेजनजवळील टोल नाक्याजवळून जात असताना, ती टोल नाक्याला घासली व सरळ रोडच्या बाजूला शेतात गेली. ही घटना रात्री १० वाजेदरम्यान घडली. त्यामध्ये एकूण २४ प्रवासी प्रवास करीत होते. सुदैवाने यामधील कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही. या अगोदरसुद्धा या ठिकाणी अनेक घटना घडलेल्या आहेत. दोन महिन्या अगोदर एसटी बसचासुद्धा अपघात याच ठिकाणी झालेला होता, कारण हा टोलनाका अरुंद असल्यामुळे बस त्या ठिकाणी जाणे शक्य नाही, व टोलनाक्याच्या अगोदर कोणत्याही प्रकारची सूचना किंवा फलक किंवा गतिरोधक बसवलेले नसल्याकारणाने वाहनांचा वेग हा जास्त असतो. त्यामुळे वाहनावर नियंत्रण मिळवणे अशक्य असल्यामुळे हे अपघात घडतात. प्रवाशांची विचारपूस केली असता, लक्झरी बसचा स्पीड जास्त असल्यामुळे व अरुंद टोल नाका असल्या कारणामुळे बस त्या ठिकाणाहून गेली असता, बसचा समोरील टायर भिंतीला घासून टायर फुटल्यामुळे लक्झरी बसच्या ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटले, व बस सरळ रोडच्या बाजूच्या शेतात घुसली. हे जर का गाडीच्या डिझेल टँकला भिंत घासली असती तर नाशिकसारखा मोठा अनर्थ झाला असता. तरी त्या ठिकाणी सूचना फलक किंवा गतिरोधक बसवावे, अशी मागणी होत आहे.
याबाबत वारंवार निवेदन देऊनसुद्धा मुजोर ठेकेदार गतिरोधक बसवण्यासाठी टाळाटाळ करत आहे. यामध्ये गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन कोणत्याही प्रकारची सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. गाडीच्या अपघाताची माहिती मिळताच, गावातील समाजकार्यात अग्रेसर असणारे मंडळी सुभाष लोढे, परमेश्वर पवार, सुरेश गुंजकर, सतीश चेके, राजू पिटकर, परमेश्वर चौगुले, विजय मापारी, संदीप लोढे, मधुसूदन कुलाल, नितीश चेके, अशोक गुंजकर, गोपाल घायाळ, सुभाष चेके, रवी गुंजकर, शुभम पवार, गजानन तेजनकर, तसेच पत्रकार विनोद पाटील तेजनकर, सतीश पाटील तेजनकर यांनी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून मोलाचे सहकार्य केले.