बंडखोरांचे टेन्शन वाढले! उद्धव ठाकरे बुलढाण्यात येणार, मेहकरात जाहीर सभा घेणार!
– कार्यकर्त्यांनी मागितली मेहकरात सभा, विराट शक्तिप्रदर्शन होणार!
बुलढाणा/मुंबई (एकनाथ माळेकर) – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचे प्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री’वर बुलढाण्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेतली. बुलढाणा जिल्हा ठाकरे यांच्यासोबत असल्याचा आणि लोकमानसही ठाकरेंना अनुकूल असल्याचा गोपनीय अहवाल प्राप्त झाल्यापासून ठाकरे हे बुलढाणा जिल्ह्यावर विशेष लक्ष ठेवून आहेत. विशेष म्हणजे, आज कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधताना, कार्यकर्त्यांनी ठाकरेंना मेहकरात सभा मागितली. त्यावर ”मी बुलढाण्यात येणार आहे, मेहकरात सभाही घेणार आहे”, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसह बुलढाणेकरांना दिले आहे. ही सभा अतिविराट करण्याचा निर्धार पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. ठाकरेंची तोफ मेहकरात धडाडणार असल्याने बंडखोरांचे टेन्शन मात्र चांगलेच वाढले आहे.
दुसरीकडे, बुलढाणा जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षात इनकमिंग वाढले असून, आगामी निवडणुकांत या पक्षाला चांगले भवितव्य असल्याने, भाजपसह, राष्ट्रवादी काँग्रेस व वंचित आघाडीचे कार्यकर्तेदेखील या पक्षात येण्यास इच्छुक आहेत. आज ‘मातोश्री’वर बुलढाण्यातील पदाधिकार्यांची बैठक आयोजित असता, यावेळी भाजपसह या पक्षांच्या काही कार्यकर्त्यांनी शिवबंधन हाती बांधले.
शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव हे बंडखोर नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत. तसेच, मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमुलकर हेदेखील बंडखोरांच्या गटात सामील झाले असून, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हेदेखील शिंदे गटात आहेत. लोकप्रतिनिधी हे शिंदे गटात गेले असले तरी, कट्टर शिवसैनिक व पदाधिकारी मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत निष्ठेने कायम आहेत. शिवाय, बंडखोरी व इतर राजकीय घडामोडी यामुळे बुलढाणेकर माणसांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठी सहानुभूतीची लाट निर्माण झालेली आहे.
अलिकडेच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने खासगी गोपनीय अहवाल मागविण्यात आला होता. त्यात, बुलढाणा हा जिल्हा ठाकरे यांना अनुकूल असल्याचा अहवाल ‘मातोश्री’वर गेलेला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी बुलढाणा जिल्ह्यात विशेष लक्ष घातलेले आहे. त्यातच, आज झालेल्या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मेहकरात जाहीर सभा मागून खासदार व आमदारांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची तोफ धडाडण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे शिवसैनिकांसह बुलढाणेकरांना आता या सभेचे औत्सुक्य निर्माण झालेले आहे.
—————-