मुंबई (प्राची कुलकर्णी) – राज्यात २१ ऑक्टोबरपासून दिवाळी सुरु होत असल्याने शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांना परीक्षा संपल्यानंतर लगेचच २० ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर सुट्टी असणार आहे. तसेच, ८ नोव्हेंबररोजी गुरुनानक जयंती असल्याने त्याही दिवशी सुट्टी राहील. म्हणजेच, ९ नोव्हेंबरपासून शैक्षणिक वर्षाच्या दुसर्या सत्रातील शाळा सुरु होतील, असे प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. दिवाळीची सुट्टी असल्याने राज्यातील शाळा एकूण १८ दिवस बंद राहणार आहेत. तसेच, दिवाळीमुळे शिक्षकांसह राज्य सरकारी कर्मचार्यांचा पगार ऑक्टोबरअखेरीस केला जाणार असून, राज्य सरकारी कर्मचार्यांना यंदा प्रत्येकी १२.५० ते १५ हजाराचा अग्रिम सरकारने दिला असला तरी, त्यातून शिक्षकांना वगळण्यात आले आहे.
दिवाळीची सुरवात २१ ऑक्टोबरला ‘वसुबारस’ने होणार आहे. गुरुवारी (ता. २०) प्राथमिक व माध्यमिक शाळांची सत्र परीक्षा संपणार आहे. त्यानंतर शुक्रवारपासून प्राथमिक व माध्यमिक शाळांना दिवाळी सुटी असेल. दिवाळीनिमित्ताने माध्यमिक शाळांना २१ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबरपर्यंत सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. वास्तविक पाहता ७ नोव्हेंबरला दिवाळी सुटी संपेल, पण ८ नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंती असल्याने त्या दिवशी शाळा बंदच राहणार आहेत. दुसरीकडे प्राथमिक (जिल्हा परिषद, खासगी प्राथमिक) शाळांना २१ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुटी असणार आहे. पण, ६ नोव्हेंबर रोजी रविवार असल्याने शाळा ७ नोव्हेंबरला (सोमवारी) सुरु होईल. त्यानंतर मंगळवारी (ता. ८) गुरुनानक जयंतीची सुट्टी असेल.
मागील दोन वर्षे कोरोना असल्याने ऑनलाईन अद्यापन काही प्रमाणात घेता आले. परंतु, पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे अंकगणित, अक्षर ओळख तसेच मुलभूत गणितीय क्रिया घेता आल्या नाहीत, किंवा त्यामध्ये विद्यार्थी मागे राहिले आहेत. अजूनही विद्यार्थी अभ्यासात बरेच कच्चे राहिले आहेत. अशा मुलांना दिवाळीच्या सुट्टीत वाचन, सराव, अंक व अक्षर ओळख होण्यासाठी दिवाळीचा अभ्यास घ्यावा, किंवा जमल्यास सुट्ट्यांमध्ये संपर्कात रहावे, असेही शिक्षण विभागाने कळवलेले आहे.
————-