Breaking newsHead linesMarathwada

BREAKING NEWS! औरंगाबादचे आमदार संजय सिरसाठ यांना ‘हर्टअ‍ॅटॅक’!

संजय शिरसाट यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. सध्या ते आयसीयूमध्ये भरती असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती संजय शिरसाठ यांचे चिरंजीव सिद्धांत शिरसाट यांनी दिली आहे.

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी) – औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय सिरसाठ यांना सोमवारी दुपारी जोरदार हृदयविकाराचा धक्का बसला असून, त्यांना औरंगाबादेतील सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु, त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर, त्यांना आज तातडीने एअर अ‍ॅम्बुलन्सद्वारे मुंबईतील लीलावती रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आता त्यांच्यावर मुंबईत एन्जोप्लास्टी करण्यात आली आहे. संजय शिरसाट यांच्यावर शस्त्रक्रिया करून एक स्टेन टाकण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, खासदार श्रीकांत शिंदे यांनी फोन करून शिरसाट यांच्या परिवाराला धीर दिला.

गेल्या दोन दिवसांपासून संजय शिरसाट यांची प्रकृती बिघडली होती. काल दुपारी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांची प्रकृती आणखी ढासळली. सध्या संजय शिरसाट यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत असले तरी, काळजीची स्थिती टळलेली नव्हती. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला लीलावती रुग्णालयात हलवण्यात आले आहे. औरंगाबाद विमानतळावरुन मंगळवारी सकाळी संजय शिरसाट एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईच्या दिशेने रवाना झाले. यावेळी विमानतळावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

शिवसेनेचे बंडखोर नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला सर्वप्रथम पाठिंबा देणार्‍यांमध्ये आमदार संजय शिरसाट यांचा समावेश होता. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात शिरसाट यांना संधी दिली जाईल, असे बोलले जात होते. परंतु, मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने संजय शिरसाट प्रचंड संतापले होते. त्यानंतर दुसरा मंत्रिमंडळ विस्तार अद्यापही रखडलाच आहे. त्यामुळे संजय शिरसाट हे अस्वस्थ असल्याची चर्चा होती. त्यांनी भर बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आपली नाराजी व्यक्त केली होती. संजय शिरसाट हे २००९, २०१४ आणि २०१९ अशा सलग तीन टर्ममध्ये औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवारीवर विजयी झालेले आहेत.


आमदार संजय शिरसाट यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस हजेरी लावली होती. तेथे त्यांनी विविध नेत्यांशी संवाद साधला. तसेच माजी मनपा आयुक्त आणि नवनियुक्त जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्यासोबतही शिरसाट यांनी गप्पा मारल्या. ही बैठक आटोपून गेल्यावर संध्याकाळी त्यांना छातीती वेदना जाणवायला लागल्या. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच संजय शिरसाट यांना तातडीने औरंगाबदेतील सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्रभर त्यांच्यावर सिग्मा रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा नसल्याने डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी मुंबईला नेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे आज सकाळी चिखलठाणा विमानतळावरून संजय शिरसाट यांना एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईला हलविण्यात आले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!