– साखरखेर्डा ठाणेदारांनी जारी केली धोक्याची सूचना
चिखली (विशेष प्रतिनिधी) – प्रशासकीय दुर्लक्ष व ठेकेदाराच्या मुजोरीमुळे कायम डोकेदुखी बनलेल्या साखरखेर्डा येथील भोगवती नदीवरील पर्यायी पुलाला पुन्हा एकदा भगदाड पडले असून, नदीला पूर आल्याने नदी काठोकाठ भरून वाहात आहे. त्यामुळे लव्हाळा – साखरखेर्डा या मार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. दुर्देवी घटनेची शक्यता पाहाता, साखरखेर्डाचे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी धोक्याची सूचना जारी केली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे साखरखेर्डा येथील भोगावती नदीच्या तीरावरील पर्यायी पुल खचला आहे. तसेच, या पुलात मधात भगदाड पडल्याने तो धोकादायक बनलेला आहे. आज (दि.१८) सकाळपासून ही नदी काठोकाठ भरून वाहत असल्याने सदर पुल धोकादायक तर बनलाच पण दुर्देवी अपघाताची शक्यताही निर्माण झाली आहे. त्यामुळे साखरखेर्डाचे ठाणेदार जितेंद्र केशवराव आडोळे यांनी तातडीने सोशल मीडियावर धोक्याची सूचना जारी केली असून, या पुलावरून लव्हाळा, साखरखेर्डा जाणार्या येणार्या जड तथा मोठ्या वाहनांनी या पुलावरून वाहने आणताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन केलेले आहे.
भोगवती नदीवरील पुलाचे काम रखडलेले असून, या गंभीर बाबीकडे स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी कानाडोळा करत आहेत. त्यामुळे लव्हाळा, साखरखेर्डा या मार्गावरील वाहतुकीची गंभीर समस्या बनली आहे. या पुलाचे काम करणारा ठेकेदार मुजोरी करत असून, त्याने गोगलगायीचे गतीने काम तर चालवलेच, पण पर्यायी मार्गदेखील व्यवस्थित तयार केलेला नाही. पर्यायी मार्गावरील पुलाला वारंवार भगदाड पडत असून, वारंवार वाहतूक विस्कळीत होत आहे. तसेच, छोटे मोठे अपघात तर दररोजच घडत आहे. एखाद्या दुर्देवी घटनेची जिल्हा प्रशासन व पालकमंत्री वाट पाहात आहेत का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
——————–