– देऊळगावराजा येथील शाह कुटुंबावर काळाचा घाला, बहिण, भाऊ, भाचे ठार
जालना (जिल्हा प्रतिनिधी) – जाफराबाद – भोकरदन रस्त्यावर माहोरा गावाजवळ अॅपेरिक्षा आणि आयशर ट्रक यांच्यात समोरा समोर झालेल्या धडकेत रिक्षातील पाच प्रवासी ठार झाले असून, हा अपघात इतका भीषण होता की, अॅपेरिक्षाचे दोन तुकडे होऊन एक भाग रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात पडला होता. आयशर ट्रक भरधाव वेगात असल्याचे हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले असून, मृतांमध्ये शाह कुटुंब आणि एका २६ वर्षीय तरुणाचा समावेश आहे. मृतक हे देऊळगावराजा येथील असून, त्यात एकाच कुटुंबातील चौघांसह एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
देऊळगावराजा येथील त्र्यंबकनगर येथील रहिवासी कैफ अश्फाक शाह (वय १९) हा त्याचा मित्र मनीष बबनराव तिरुखे (वय २६) याला घेऊन अॅपेरिक्षा (क्रमांक एमएच २८ बीए ०२५६) द्वारे बुलढाणा तालुक्यातील माळवंडी येथे बहिणीला आणण्यासाठी गेला होता. दुपारी ते माळवंडी येथून धाडमार्गे बहीण परवीन बी राजू शहा (वय २५), आलिया राजू शाह (वय ७), मुस्कान राजू शाह (वय ३) यांच्यासह देऊळगावराजाकडे निघाले होते. माहोरा -जाफ्राबाद रोडवर जाफ्राबादकडून येणार्या भरधाव आयशर ट्रकने (क्रमांक एमएच २८ बीबी २३५७) त्यांना समोरून जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की रिक्षाचे अक्षरशः दोन तुकडे होऊन एक तुकडा रस्त्यावर तर दुसरा शेतात फेकल्या गेला. त्यात कैफ अश्फाक शाह, परवीन बी राजू शहा हे बहीण-भाऊ आणि आलिया व मुस्कान राजू शाह हे भाचे या चौघांसह मनीष तिरुखे या त्यांच्या मित्राचा असे पाच जणांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला.
तर बाळू खरात (वय २३) व सानिया शाह (वय ९) हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची तीव्रता पाहाता, उपस्थित नागरिकांनी तातडीने घटनास्थळी घाव घेतली व मदत कार्य सुरु केले. सर्वांना रिक्षातून बाहेर काढत, जाप्रâाबाद येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. जाप्रâाबादचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजाराम तडवी व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत, मृत व जखमींना वैद्यकीय सहाय्य मिळवून देणेकामी प्रयत्न केले.
– अपघातातील मृतांची नावे –
१. मनीष बबन तिरुखे (वय २६ वर्ष) देउळगावराजा, जिल्हा बुलढाणा
२. परवीन बी राजू शहा (वय २५)
३. आलिया राजू शहा (वय ७)
४. मुस्कान राजू शहा (वय ३)
५. कैफ अशपाक शहा (वय १९).
—————