मराठा मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांचा फेसबुक लाईव्ह येत आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई (ब्रेकिंग महाराष्ट्र) – सोशल मीडियावर माझी बदनामी केल्याच्या आरोप करत, मराठा मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी फेसबुकवर लाईव्ह येत उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांमध्ये आपल्यावर चुकीचे आरोप झाले. त्यामुळे माझी नाहक बदनामी केली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याजवळच्या माणसांनी मला त्रास दिला, असा आरोप करत केरे यांनी विष प्राशन केले. त्यांना तातडीने जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती ही स्थिर असून, उपचार सुरू आहे. आपण समाजाला कधीही विकले नाही. मात्र मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्तकांनी आपली बदनामी केली. ही बदनामी असह्य झाल्यामुळे आपण जीवन संपवत असल्याचे रमेश केरे यांनी म्हटले आहे.
रमेश केरे पाटील यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मराठा मोर्चावेळी राजकीय नेत्यांकडून आर्थिक लाभ मिळवण्याचा आरोप होत होता. सोशल मीडियावरून होत असलेल्या गंभीर आरोपांनंतर रमेश केरे पाटील यांनी आज थेट फेसबुक लाईव्ह करूनच स्वत:चे जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. रमेश केरे यांनी फेसबूक लाईव्हमध्ये म्हटले आहे की, मला माफ करा. सर्व बांधवांना हा माझा शेवटचा जय शिवराय. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केले. मात्र, सोशल मीडियात माझी ऑडिओ क्लिप फिरवून माझी बदनामी केली जात आहे. हे माझे शेवटचे फेसबूक लाईव्ह आहे. मी मराठा आरक्षणासाठी प्रमाणिक प्रयत्न केले. याची सरकारनेही दखल घेतली. सरकारने मराठा आरक्षणासाठी उपसमिती गठीत केली. त्याचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांत पाटलांना करण्यास मी विरोध केला. चंद्रकांत पाटलांचे हस्तक विनाकारण माझी बदनामी करत आहेत. ही बदनामी मी सहन करू शकत नाही. समाजाचे नुकसान होईल, असे मी कधीही काहीही केलेले नाही. मी कधीही समाजाला विकले नाही. त्यामुळे ज्यांनी माझी बदनामी केली, माझ्यावर आरोप केले, त्या सर्वांची चौकशी करावी, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे माझी मागणी आहे. त्या सर्वांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. हे आरोपी सुटता कामा नये. मी गेल्यानंतर माझ्या बायकोला, मुलाला सांभाळा, असे आवाहनही रमेश केरे यांनी केले. रमेश केरे म्हणाले, माझी क्लिप कोणी व्हायरल केली हे मुख्यमंत्र्यांनी शोधून काढावे. त्याची सविस्तर चौकशी करावी. समाजाला मी आई मानतो, तिलाच विकण्याचे काम मी कसे करू शकतो, असा सवालही त्यांनी केला आहे.
फेसबुक लाईव्ह व्हिडिओमध्ये रमेश केरे ज्या ऑडिओ क्लिपचा उल्लेख करत आहेत, ती क्लिप सोशल मीडियावर यापूर्वी व्हायरल झाली आहे. यामध्ये युती सरकारच्या काळात मराठा क्रांती मोर्चात फूट पाडण्यासाठी काही समन्वयकांनी पैसे स्वीकारल्याचा आरोप करण्यात आला आहे. यातूनच रमेश केरे यांचे नाव समोर आले होते. मात्र, रमेश केरे यांनी आपल्या बदनामीसाठी ही क्लिप व्हायरल करण्यात आल्याचे म्हटले आहे. दरम्यान, केरे यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.
रमेश केरे पाटलांच्या जीवाचे बरेवाईट झाल्यास महाराष्ट्र बंदचा इशारा
रमेश केरे पाटील यांच्यावर जे जे रुग्णालयात उपचार सुरू असून त्याठिकाणी अनेक मराठा नेते देखील पोहचले आहे. रमेश केरे पाटील यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या जीवाचे बरे वाईट झाल्यास महाराष्ट्र बंद करू अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आप्पासाहेब कुढेकर यांनी दिली आहे. रमेश केरे यांची ऑडिओ क्लिप आणि फोटो व्हायरल करण्यासाठी कॅम्पेन राबवल्या जात असल्याचा आरोप देखील कुढेकर यांनी केला आहे. दुसरीकडे, औरंगाबादेत रमेश केरे पाटील यांच्या पत्नी आशाताई केरे या पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात पोहोचून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे, ज्यांनी ज्यांनी ऑडिओ क्लिप व्हायरल केली त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणीची तक्रार यावेळी रमेश केरे पाटील यांच्या पत्नी आशाताई केरे केली आहे.
—————–