वर्धा (विशेष प्रतिनिधी) – सावंगीच्या दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठातील मुख्य वैज्ञानिक अधिकारी डॉ. संदीप श्रीवास्तव आणि स्रीरोगतज्ज्ञ डॉ. दीप्ती श्रीवास्तव यांची कन्या डाॅ. प्रियल हिने डायदेमद्वारे आयोजित सौंदर्य स्पर्धेत मिस महाराष्ट्र सन्मान पटकावीत सौंदर्यवती विजेतेपदाचा सर्वोत्कृष्ट मुकुट प्राप्त केला.
डायदेम या बहुराष्ट्रीय कंपनीद्वारे सेंट अॅन्ड्रयू ऑडिटोरियम, मुंबई येथे आयोजित या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत सहभागी झालेल्या ३० युवतींमधून सर्वोत्तम सादरीकरण करीत आणि आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवीत प्रियलने स्पर्धेच्या निवड मंडळाला आणि उपस्थितांना जिंकले. मिस युनाईटेड नेशन्स विजेती अमिशा चौधरी, परीक्षक प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, मनमोहन तिवारी व सिमरन विग यांच्या हस्ते सौंदर्यवतीपदाच्या मुकुटाने तिला सन्मानित करण्यात आले. सेवाभाव, सचोटी आणि समर्पण ही आपल्या जगण्याची त्रिसुत्री आहे, असे प्रतिपादन स्पर्धेच्या संवाद फेरीत प्रियलने केले.
प्रियल ही बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातून अव्वलस्थानी राहिली असून एमबीबीएसच्या अंतिम परीक्षेत तिने १५ सुवर्ण पदके प्राप्त केली होती. सध्या ती रेडिओडायग्नोसिस विषयात स्नातकोत्तर पदवीचा अभ्यास करीत आहे. मासिकपाळीच्या काळात स्रियांनी आहार आणि स्वच्छतेबाबत सजग राहण्यासाठी ‘मासिक सत्य’ हा जनजागृतीपर उपक्रम वंचितांसाठी राबविण्यास ती प्राधान्य देते आहे. प्रियलच्या या यशासाठी आयुर्विज्ञान संस्थेचे विश्वस्त सागर मेघे यांनी अभिनंदन केले असून आगामी वाटचालीस पूर्णतः सहकार्य करण्याची शाश्वती दिली आहे.
बहुआयामी व्यक्तिमत्व विकासाची प्रेरणा कुटुंबातूनच – डाॅ. प्रियल
सखोल अभ्यासासोबतच आपले व्यक्तिमत्व अधिक समृद्ध करण्यासाठी विविध क्षेत्रात कार्यरत राहण्याची प्रेरणा आईवडिलांकडून सातत्याने मिळाली आहे. त्यांचा सामाजिक जाणिवांचा आणि संशोधनवृत्तीचा वारसा मी पुढे नेत आहे, असे मनोगत डाॅ. प्रियल श्रीवास्तव हिने व्यक्त केले.