बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – हातात कुजके सोयाबीन घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या जिल्हाध्यक्षांसह कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. परतीच्या जोरदार पावसाने जिल्ह्यातील चार लाख हेक्टरवरील सोयाबीन, पावणेदोन लाख हेक्टरवरील कपाशी आणि तूर, उडीद, मका आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तत्काळ सर्वेक्षण करून मदत देण्यात यावी, सोयाबीनला १० हजार रुपये क्विंटल भाव द्यावा, आदी मागण्या जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आल्या. यावेळी सोबत आणलेल्या कुजक्या सोयाबीनच्या सुड्या त्यांनी जिल्हाधिकार्यांना दाखवल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. बाधित शेतकर्यांना मदत करा, अन्यथा शिवसेनेच्या आक्रमक पद्धतीने जिल्हाव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी जिल्हाधिकारी यांना दिला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज (दि.१२) शेतीपिकाच्या नुकसानीसंदर्भात आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. हातात अतिवृष्टीमुळे सडलेले सोयाबीन घेत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घोषणांनी दणाणून सोडले. यावेळी जिल्हाप्रमुख बुधवत यांनी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्यासमक्ष जिल्ह्यातील खरीप हंगामाची विदारक स्थिती मांडली. खरीप हंगामात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर या चारही महिन्यांत अतिवृष्टी झाली. यामुळे चार लाख हेक्टरवरील सोयाबीन, पावणेदोन लाख हेक्टरवरील कपाशी आणि तूर, उडीद, मका आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यावेळी सोबत आणलेल्या कुजक्या सोयाबीनच्या सुड्या त्यांनी जिल्हाधिकार्यांना दाखवल्या. या नुकसानीचे तत्काळ सर्वेक्षण करून मदत देण्यात यावी, सोयाबीनला १० हजार रुपये क्विंटल भाव द्यावा, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
या शिष्टमंडळात उपजिल्हाप्रमुख संजय हाडे, विधानसभा संघटक अशोक इंगळे, माजी तालुका प्रमुख डॉ. मधुसूदन सावळे, तालुका प्रमुख लखन गाडेकर, शहर प्रमुख हेमंत खेडेकर, युवा सेना तालुकाप्रमुख नीलेश राठोड, वैद्यकीय आघाडीचे डॉ. अरुण पोफळे, युवासेना शहर प्रमुख सचिन परांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.