Breaking newsHead linesMaharashtraWorld update

‘धनुष्यबाण’ कुणाचा? उद्या फैसला शक्य!

– ठाकरे-शिंदे दोन्ही गट दिल्लीत निवडणूक आयोगाकडे हजर
– अंधेरी पोटनिवडणुकीपूर्व धनुष्यबाण चिन्हाचा निकाल तूर्त तरी अशक्य!

नवी दिल्ली (विशेष राजकीय प्रतिनिधी) – शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ कुणाचा, याचा पैâसला आज होऊ शकला नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे या दोन्ही गटांनी आज आपआपली कागदपत्रे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केली. प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी ठाकरे गटाने आणखी वेळ मागवून घेतला. तर शिंदे गटाने तातडीने चिन्ह वाटप करण्याची मागणी रेटून धरली. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे कागदपत्रे सादर करण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ मागितला होता. परंतु, निवडणूक आयोगाने त्यांची ही मागणी फेटाळून लावलत, ठाकरे गटासाठी उद्या दुपारी दोन वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे. दिल्लीत वरिष्ठ स्तरावरही यासंदर्भात ‘मोठी लॉबिंग’ सुरु असल्याचे दिसून आल्याने, ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाबाबत ”चमत्कार” होऊ शकतो, असेही वरिष्ठ राजकीय सूत्राने खासगीत सांगितले आहे.

निवडणूक आयोगात पक्षाच्या चिन्हावरुन आज महत्त्वाची सुनावणी झाली. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे पक्ष सदस्यात्वाचे तब्बल सात लाख प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्या गटाने अडीच लाख प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत. शिंदे गटाने आज कागदपत्रे सादर करण्यासाठी प्रचंड धावाधाव केली. त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे गटाकडूनही कागदपत्रे सादर करण्यासाठी धावाधाव सुरु होती. उद्धव ठाकरेंच्यावतीने दुपारी जेष्ठ वकील देवदत्त कामत यांच्या माध्यमातून कागदपत्र सादर करण्यात आली. शिवसेनेची बाजू मांडण्यासाठी आज शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनिल देसाई हेदेखील दिल्लीत दाखल झाले आहेत. पक्षचिन्हावर आज निवडणूक आयोगात अंतिम सुनावणी होईल, असा अंदाज होता. पण शिवसेनेकडून आणखी मुदतवाढ मागण्यात आल्याने निवडणूक आयोगाने उद्या दुपारी दोन वाजेपर्यंतचा वेळ शिवसेनेला दिला. त्यामुळे उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत शिवसेनेला आपली बाजू मांडता येणार आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत १४ ऑक्टोबर ही आहे. त्याआधी चिन्हाचा निर्णय होणे आवश्यक असल्याचे शिंदे गटाचे म्हणणे आहे.

सुरुवातीला शिंदे गटाने विधीमंडळ पक्षातील एकूण सदस्यांपैकी दोन तृतीयांश सदस्य आपल्या सोबत असल्याचे सांगत, आपल्याला शिवसेनेचे निवडणूक चिन्ह मिळावे, असा अर्ज निवडणूक आयोगाकडे केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला आयोगाच्या नियमाप्रमाणे विहित नमुन्यात अर्ज करण्यास सांगितले. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला नोटीस बजावली. एकनाथ शिंदे गटाने सादर केलेल्या कागदपत्रांची मागणी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली. आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला ठाकरे गटाला कागदपत्रांच्या प्रतिलिपी देण्याचे आदेश दिले. मात्र, शिंदे गटाकडून अद्यापपर्यंत कोणतेही कागदपत्र मिळाले नसल्याचा ठाकरे गटाचा दावा आहे. त्यामुळे जोपर्यंत कागदपत्र मिळत नाहीत, तोपर्यंत उत्तर कसे देणार? असा ठाकरे गटाचा सवाल आहे.

एकनाथ शिंदेंचा शिवसेना पक्षाध्यक्ष पदावरच दावा!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट शिवसेनेच्या पक्षाध्यक्षपदावर दावा केल्याची माहिती समोर आली असून, शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे, त्यामध्ये शिवसेना पक्षाध्यक्षपदाचा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रतिज्ञापत्रात ४० आमदार आणि १२ खासदारांसह लाखो प्राथमिक सदस्य पाठीशी असल्याचाही उल्लेख आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात शिवसेना कुणाची याचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


भाजपने अडिच वर्षापासून रचले शिवसेना फोडण्याचे षडयंत्र!

शिवसेना फोडण्यासाठी भाजप हा अडीच वर्षापासून षडयंत्र रचत होता, हे चंद्रकांतदादा पाटील यांच्या तोंडूनच स्पष्ट झाले आहे. एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांतदादा म्हणाले, की दोन अडीच वर्षापासून आपलं सरकार येईल असे सांगत होतो. हे सांगायला मी काही वेडा नव्हतो. त्यासाठी योजना बनवत होतो, असे विधान पाटील यांनी यावेळी केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला कार्यकर्त्यांना विश्वास द्यायचा होता. ४० जणांना बाहेर काढणे सोपे नव्हते. त्यासाठी वेळ लागणार होता. त्यासोबत तशी संधी येणेही महत्त्वाचे होते. शेवटी ती वेळ साधल्या गेली आणि आपले सरकार आणले, असा खुलासा भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
——————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!