– घातपाताचा संशय, शेगाव पोलिसांनी तातडीने तपासाची गरज
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथील मूळ रहिवासी प्रदीप गुलाबराव देशमुख या बेपत्ता युवकाचा मृतदेह गुरुवारी पूर्णा नदी पात्रातील पेसोडा गावालत कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, याबाबत घातपाताचा संशय व्यक्त होत असून, शेगाव पोलिसांनी या प्रकरणात दाखल तक्रारीत कसून शोध घेण्याची गरज आहे.
सविस्तर असे, की मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथील रहिवासी प्रदीप देशमुख हा वैद्यकीय प्रतिनिधी असल्याने एका खाजगी कंपनीत औषध वितरण करण्यासाठी गेलेला होता व खामगाव येथे राहात होता. त्याचा चुलत भाऊ मनोज देशमुख यांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता, तो फोन उचलत नसल्याने खामगाव येथे जाऊन त्याची चौकशी केली असता, प्रदीप घरी नसल्याचे त्यांना समजले. त्यांनी प्रदीप याच्या मोबाईलवर वारंवार संपर्क साधला असता, प्रदीप यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे देशमुख कुटुंब घाबरून गेले. त्यांनी खामगाव, शेगाव परिसरात त्याचा शोध घेतला परंतु तो मिळून न आल्याने शेवटी शेगाव पोलीस स्टेशनला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या प्रदीपचा मृतदेह आज पूर्णा नदीपात्रात पेसोडा गावालगत आढळून आलेला आहे.
याबाबतची माहिती तेथील पोलिस पाटील राजेश पुंडे, सरपंच अनंता भिषे, कोतवाल संजय पुंडे यांनी खामगाव पोलिसांना दिली होती. मात्र, मृतदेह कुजलेला असल्याने पेसोडा येथील नागरिकांच्या सहकार्याने शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार पेसोडे गावालगत करण्यात आले. या दुर्देवी घटनेने देशमुख कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळलेला आहे. तसेच, हा प्रकार घातपाताचा असल्याचा संशय व्यक्त होत असून, शेगाव पोलिसांनी तातडीने सखोल चौकशी करण्याची गरज निर्माण झालेली आहे.
——————-