मेहकर (तालुका प्रतिनिधी) – रस्त्यावर बंद पडलेल्या टिप्परला मोटरसायकल धडकल्याने मोटारसायकलवरील भालेगाव (ता.मेहकर) येथील माजी सरपंच सुरेश विठोबा धोंडगे (४५) हे जागीच ठार झाले होते, तर त्यांच्या सोबतचे भालेगावातीलच भगवान निकस हे गंभीर जखमी झाले होते. २ ऑक्टोंबरच्या रात्री साडेआठच्या सुमारास मेहकर – जानेफळ रस्त्यावर समृद्धी महामार्गाजवळ हा अपघात झाला होता. या अपघातातील गंभीर जखमी भगवान निकस यांच्यावर औरंगाबादेत उपचार सुरु असताना, त्यांची काल रात्री मृत्युशी झुंज संपली व त्यांनीही देह ठेवला आहे. त्यामुळे या भीषण अपघाताने दोन बळी घेतल्याने भालेगाववर शोककळा पसरली आहे. अपघाताच्या रात्री (२ ऑक्टोबर) संतप्त ग्रामस्थांनी संबंधित टिप्पर पेटवून आपला निषेध व्यक्त केला होता.
भालेगावचे माजी सरपंच सुरेश विठोबा धोंडगे व भगवान सुखदेव निकस (४२) दोघे मोहदरी येथे कामानिमित्त जात होते. दरम्यान, मेहकर- जानेफळ रस्त्यावर समृद्धी महामार्गजवळ एक टिप्पर बंद पडलेल्या अवस्थेत उभे होते. टिप्पर चालकाने रेडिअम लावलेले नव्हते, तसेच पाठीमागे असलेले लाईट बंद ठेवलेले होते. धोंडगे यांना टिप्पर दिसले नाही. त्यामुळे त्यांची दुचाकी टिप्परवर धडकली. त्यात धोंडगे यांचा जागीच मृत्यु झाला तर निकस गंभीर जखमी झाल्याने त्यांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले होते. या दुर्देवी अपघातानंतर संतप्त जमावाने टिप्पर पेटवून दिले. मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यावेळी संतप्त जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली होती. अग्निशामक दलाने टिप्पर विझवले होते. या अपघातात, भालेगाव येथील भगवान निकस यांना जबर मार लागल्याने त्यांना औरंगाबादला हलवण्यात आले होते. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु असतानाच, काल रात्री त्यांचीदेखील प्राणज्योत मालवली. त्यामुळे बंद पडलेला टिप्पर धोकादायकरित्या उभा ठेवून झालेल्या दुर्देवी अपघाताने दोन बळी घेतले आहेत. त्यामुळे भालेगावात शोककळा पसरली आहे.
—————————