कोल्हापूर-रत्नागिरी, फुलेवाडी ते गगनबावडा मार्ग उखडला; जागोजागी खड्डे, जीव धोक्यात घालून प्रवास!
– १५ ऑक्टोबरपूर्वी डांबरीकरण, खड्डे न बुजविल्यास रस्ता रोकोचा राष्ट्रवादी काँग्रेस इशारा
कोल्हापूर (शिवानी प्रभावळे) – कोल्हापूर ते रत्नागिरी व फुलेवाडी-गगनबावडा मार्ग जागोजागी उखडला असून, या मार्गावर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे अनेक छोटेमोठे अपघात होत असून, त्यातून जीवितहानीचीही शक्यता नाकरता येत नाही. फुलेवाडी ते गगनबावडा हा रस्ता तर पूर्ण खड्डेमय झाला असून, अनेक जणांना या रस्त्यावर जीव गमवावा लागला आहे, तर अनेक लोक जखमी झाले आहेत. या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तेव्हा, या मार्गांचे १५ ऑक्टोबरच्याआत डांबरीकरण करून खड्डे बुजविण्यात यावेत, अन्यथा रस्ता रोकोसह तीव्र आंदोलनाचा इशारा तब्बल २० गावांच्या सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी दिलेला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी डोळ्यावर गेंड्याची कातडी पांघरल्याने, या मार्गांनी जाणार्या वाहनधारक, प्रवासी, विद्यार्थी व ग्रामस्थांचे अतोनात हाल होत असताना, स्थानिक लोकप्रतिनिधीही मूग गिळून बसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. हा संताप आता तीव्र आंदोलनांतून बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर लहान मोठ्या वाहनांची प्रचंड रहदारी वाढली आहे. त्याच बरोबर ग्रामीण भागातील लोक कामानिमित्त कोल्हापूर शहरात येत असतात. तर शहरातील लोक नोकरीनिमित्ताने करवीर, पन्हाळा, शाहूवाडी याभागात दुचाकी वरून ये-जा करीत असतात. पन्हाळा ऐतिहासिक पर्यटनस्थळ असल्याने आणि डोंगराचा राजा जोतिबा हे मोठे धार्मिक श्रध्दास्थान असल्याने भाविकांची आणि पर्यटकांची या मार्गावरदेखील प्रचंड वर्दळ असते. पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलापासून, रत्नागिरीस जाणार्या या महामार्गावर प्रचंड खड्डे पडले आहेत. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी छोटे-मोठे अपघात होऊन वादावादी, शिवीगाळ, शाब्दिक चकमक होत असल्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. तरी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने या महामार्गावरील खड्डे (पॅचवर्क) त्वरित भरून घ्यावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. त्याचबरोबर फुलेवाडी ते गगनबावडा मार्गावरील त्वरित रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अन्यथा रस्ता रोको करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष मधुकर जांभळे यांच्या नेतृत्वाखाली २० गावांच्या सरपंच, उपसरपंचांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग सातचे कार्यकारी अभियंता यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
फुलेवाडी ते गगनबावडा रस्ता खड्डेमय झाला असून, अनेक जणांना या रस्त्यावर जीव गमवावा लागला आहे, तर अनेक लोक जखमी झाले आहेत. या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावरून कोकणात गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. तसेच कुंभी, राजाराम, डी. वाय. पाटील , दालमिया इत्यादी कारखान्याची ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात असते, तसेच कोपार्डे जनावरांचा बाजार कळे, सांगरूळ येथे ग्रामीण भागातील मोठया व्यापारपेठा आहेत. रोजगारासाठी शहराकडे जाणार्या तरुणांची संख्या जास्त आहे. हा रस्ता अरुंद असून रस्त्यावर अतिक्रमणे असल्याने तरुण मुलांना जीव गमवावे लागत आहेत. महामार्ग विभागाने तात्काळ रस्त्याचे काम सुरु करावे, तसेच बालिंगे येथे नवीन पूल बांधण्यात येणार आहे तो बास्केट ब्रिज व्हावा अन्यथा या पुराचा धोका बालिंगे, नागदेववाडी, पाडळी खुर्द, दोनवडे, साबळेवाडी, कोगे इत्यादी गावांना होणार आहे. गावात पाणी शिरून घराचे, शेतीचे नुकसान होणार आहे. या रस्त्याचे येत्या १५ दिवसात डांबरीकरण करून खड्डे बुजवावे, अन्यथा १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता २० गावाचे सरपंच व ग्रामस्थ बालिंगे येथे रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे या पत्रकात म्हटले आहे. या निवेदनावर मधुकर जांभळे, सरपंच प्रकाश रोटे, राजेंद्र दिवस, संग्राम भापकर, साताप्पा जाधव, मरार जाभळे, शिवाजी देसाई, यांच्यासह अन्य सरपंचाच्या सह्या आहेत.
————-