- भाजप जिल्हा उपाध्यक्ष अंकूर देशपांडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून निधीला मंजुरी
- वारंवार होणाऱ्या अपघातांना बसणार ब्रेक; CRIF योजनेतून महालक्ष्मी तलावाजवळील कामाचा मार्ग मोकळा
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : साखरखेर्डा ते मेहकर या वर्दळीच्या राज्य मार्गावरील महालक्ष्मी तलावाजवळ प्रवाशांसाठी ‘मृत्यूचा सापळा’ ठरलेले अत्यंत धोकादायक वळण अखेर सरळ होणार असून, त्या ठिकाणी नवीन पूल बांधण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अंकूर देशपांडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला या यशामुळे मोठे फळ मिळाले आहे.
साखरखेर्डा ते मेहकर मार्गावरील महालक्ष्मी तलावाजवळ एक तीव्र वळण आहे. या धोकादायक वळणामुळे गेल्या काही काळापासून सातत्याने छोटे-मोठे अपघात घडत होते. अनेक निष्पाप प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता, तर काहींना गंभीर दुखापतींमुळे अपंगत्व आले होते. या जीवघेण्या समस्येमुळे वाहनचालक आणि परिसरातील नागरिकांमध्ये सतत भीतीचे वातावरण होते.
अंकूर देशपांडेंचा सातत्यपूर्ण पाठपुरावा
या गंभीर समस्येची दखल घेत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अंकूर देशपांडे यांनी याप्रश्नी तातडीने पुढाकार घेतला. त्यांनी प्रत्यक्ष दिल्लीत जाऊन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि या मार्गाचे सरळीकरण व नवीन पूल बांधण्याची आग्रही मागणी केली. निव्वळ कागदोपत्री निवेदन देऊन न थांबता, देशपांडे यांनी केंद्रीय पातळीवर या प्रस्तावाचा सतत पाठपुरावा सुरू ठेवला.
अंकूर देशपांडे यांच्या निवेदनाची आणि पाठपुराव्याची दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या कामाला सर्वोच्च प्राधान्य दिले. भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (प्रादेशिक कार्यालय, महाराष्ट्र व गोवा) ९ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या पत्रकानुसार, राज्यातील २१४ विकासकामांसाठी एकूण २०९३.०९ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे.
याच केंद्रीय रस्ते निधीअंतर्गत (CRIF) महालक्ष्मी तलावाजवळील वळण सरळीकरण आणि पुलाच्या कामासाठी तब्बल १० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. या मंजुरीचे अधिकृत पत्र निर्गमित झाले असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
“महालक्ष्मी तलावाजवळील वळणावर होणारे अपघात रोखणे हे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अत्यंत गरजेचे होते. माननीय नितीनजी गडकरी साहेबांनी तातडीने निर्णय घेत १० कोटींचा निधी दिल्याने परिसरातील नागरिकांना आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.” — अंकूर देशपांडे, जिल्हा उपाध्यक्ष, भाजप
हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने साखरखेर्डा, मेहकर व परिसरातील नागरिक, प्रवासी आणि वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले असून अंकूर देशपांडे यांच्या या पाठपुराव्याबद्दल त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.