-अंगणवाडी सेविकांचे पोषण आहार, मातृत्व योजना व बालविकासावर प्रभावी पथनाट्य; विविध विषयांवर जनजागृती
चिखली (राजेंद्र घुबे) : एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प बुलढाणा दक्षिण, बीट चिखली यांच्या वतीने ‘आधारशिला व नवचेतना’ या संकल्पनेवर आधारित वेलकम मेळाव्याचे आयोजन गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक जिल्हा परिषद क्रीडा संकुल, चिखली येथे करण्यात आले होते.
या मेळाव्यात अंगणवाडी सेविकांनी पथनाट्याच्या माध्यमातून पोषण आहार, मातृत्व योजना, आहारातील विविधता, बालकांच्या मेंदूचा विकास आणि अंगणवाडी व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर प्रभावी जनजागृती केली. पथनाट्याच्या माध्यमातून उपस्थित लाभार्थ्यांना माता व बालकांच्या आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली. गर्भवती महिला, स्तनदा माता आणि लहान बालकांच्या पोषणाचे महत्त्व अधोरेखित करताना सकस, संतुलित व विविध प्रकारच्या आहाराची गरज पटवून देण्यात आली. तसेच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य पोषण आणि लहान वयात मेंदूच्या होणाऱ्या विकासाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
टी.एच.आर.पासून पौष्टिक पदार्थ तयार करण्याचे मार्गदर्शन
अंगणवाडी केंद्रांमार्फत लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या टी.एच.आर. (टेक होम रेशन) अर्थात घरपोच पोषण आहारापासून विविध प्रकारचे पौष्टिक पदार्थ तयार करता येतात, हे प्रात्यक्षिक आणि जनजागृतीच्या माध्यमातून दाखवून देण्यात आले. बालकांना गरम, ताजा व सकस आहार देण्याचे महत्त्व सांगतानाच आहारात विविधता ठेवण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. अंगणवाडी केंद्रांचे प्रभावी व्यवस्थापन करणे, लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचविणे आणि माता व बालकांच्या आरोग्यविषयक सवयींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे, या उद्देशाने मेळाव्यात विविध उपक्रम राबविण्यात आले. अंगणवाडी सेविकांनी सादर केलेल्या पथनाट्याला उपस्थितांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
गुणवंत विद्यार्थिनी प्राची चव्हाण हिचा सत्कार
या वेळी इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९१ टक्के गुण मिळवून विशेष प्रावीण्य संपादन करणाऱ्या प्राची विनोद चव्हाण या गुणवंत विद्यार्थिनीचा कांचन पाटील आणि राठोड साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अधिकारी, अंगणवाडी कर्मचारी व पालकांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे नागरी प्रकल्प अधिकारी श्री. राठोड साहेब होते. प्रमुख पाहुणे म्हणून एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे ग्रामीण प्रकल्प अधिकारी श्री. वाघ साहेब, सौ. कांचन वृषभ पडघान पाटील, प्रतीक्षा राठोड मॅडम, अंगणवाडी पर्यवेक्षिका सुरेखा जाधव मॅडम, रंजना धोरण मॅडम, किरण गुंजकर मॅडम, सपना मॅडम तसेच पत्रकार व लेखक विनोद चव्हाण उपस्थित होते. या मेळाव्याला चिखली परिसरातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, लाभार्थी आणि पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली अवचार व अनिता भंडारे यांनी केले, तर मंदा बनकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. माता व बालकांचे आरोग्य, पोषण आणि सर्वांगीण विकास याबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यामुळे अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यास मदत झाली. मेळाव्याच्या यशस्वितेसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी अथक परिश्रम घेतले.