चिखली (एकनाथ माळेकर) – खासगी झाळांच्या झगमगाटात जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर असतानाच, चिखली तालुक्यातील इसरूळ येथील ग्रामस्थ व स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, दानशुर यांनी पुढाकार घेऊन झेडपीची शाळादेखील अद्ययावत करत आयएसओ मानांकित करण्याचा निर्धार केला आहे. त्यादृष्टीकोनातून लोकसहभागातून लोकवर्गणी व विविध साहित्यदेखील ग्रामस्थांनी दान दिले असून, अशा प्रकारे आयएसओ मानांकन मिळवणारी इसरूळ येथील शाळा चिखली तालुक्यात पहिलीच ठरणार आहे.
सविस्तर असे, की चिखली तालुक्यातील शाळा व्यवस्थापन समितीची नुकतीच सभा पार पडली. या सभेमध्ये शाळा आयएसओ करण्याच्या बाबतीत चर्चा झाली, आणि शाळा समिती आणि कर्मचारी व पालक वर्ग यांची संयुक्त बैठक घेऊन, शाळा आयएसओ करण्यासंदर्भात चिखली तालुक्यातील सर्वात मोठा निर्णय हा इसरुळ येथील समितीने घेतला. त्यामध्ये लोकसहभागातून प्रमोद विष्णू भुतेकर व सुनील गणेश भुतेकर यांनी प्रत्येकी चार हजार रुपये, गोविंद भुतेकर यांनी शाळेचे दरवाजे आणि कलरसाठी चार हजार रुपये दिले आहेत. संतोष पाटील भुतेकर यांनी शाळेमध्ये फिटिंग व कलरसाठी पंधरा हजार रुपये दिले. फकीरा सेठ यांनी १६ हजार रुपये कलर साठी दिले. प्रभाकर भाऊसाहेब भुतेकर यांनी एकवीस हजार रुपयांचा शाळेला कलर घेऊन दिलेला आहे. अनिल भुतेकर यांनी तीन हजार रुपये तसेच आपल्या गावातील सर्व नोकरदार मंडळी यामध्ये नितीन भुतेकर सर आणि अरविंद भुतेकर सरांनी पुढाकार घेऊन शाळेला एक लाख २५ हजार रुपये किमतीचे आयएसओसाठी आवश्यक असणारे खूप साहित्य खरेदी करून दिले आहे.
या शिवाय, गावातील भरपूर मंडळींनी या कामासाठी सहकार्य केले असून, दिनकर एकनाथ भुतेकर दोन हजार रुपये, प्रवीण प्रल्हाद गाडेकर यांनी दोन हजार रुपये, राजू पाटील भुतेकर यांनी दोन हजार रुपये, संदीप प्रल्हाद भुतेकर यांनी दोन हजार रुपये, अमोल नरहरी भुतेकर यांनी हजार रुपये, तसेच संदीप जोशी यांनी दोन हजार रुपये व गावातील सुज्ञ नागरिकांनी या शाळा आय एस ओ होण्यासाठी आपला आर्थिक स्वरूपात सहभाग नोंदवला आहे. आयएसओ होणार्या शाळेचे तसेच शिक्षकवर्ग यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
आज सरकारी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे. परंतु ग्रामीण भागातील इसरूळ शाळा त्याला अपवाद ठरणरी आहे. खासगी शाळांच्या तोडीस तोड काम शाळा आज करत आहे. इतर जिल्हा परिषद शाळांनीसुद्धा या शाळेचा आदर्श घेऊन आपल्या गावाची व आपली शाळा आयएसओ कशी होईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शाळेची शैक्षणिक गुणवत्तादेखील चांगली असून, या शाळेचे विद्यार्थी विविध स्तरावर चमकले आहेत.
——————-