उस्मानाबाद (विठ्ठल चिकुंद्रे) – उमरगा शहरात दसरा सणानिमित्त काल, दि. ५ ऑक्टोबररोजी सकाळी ९ वाजता हुतात्मा स्मारक येथून विवेक यात्रा काढण्यात येऊन सालाबादाप्रमाणे याहीवर्षी विवेक जागृती व प्रबोधनाची परंपरा जोपासण्यात आली. अॅड. शीतल चव्हाण व त्यांचे सहकारी मिळून प्रा.शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालयाच्या माध्यमातून समाजात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी व विविध विषयांवर प्रबोधन करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून हे स्तुत्य काम करीत आहेत. ग्रंथतुला, पुस्तकपालखी, ग्रंथदिंडी, पुस्तक वाचणारा गणपती, वाचन टपरी अशा अनेक संकल्पना त्यांनी आजवर राबवल्या आहेत.
गेल्या वर्षीपासून दसर्याच्या सणाला विद्यार्थी, तरुण, महिला व पुरुषांच्या हातात पुस्तके, लेखण्या व महामानवांच्या विचारांचे फलक देवून विवेकयात्रा काढण्याची पद्धत त्यांनी सुरु केली आहे. यंदा ही विवेकयात्रा उमरगा शहरातून काढण्यात आली. अज्ञानाचे सीमोल्लंघन करुन महामानवांच्या विचारांचे सोने लुटणारी व विवेकाचा जागर करणारी ही यात्रा होती. यात पुस्तके, लेखण्या, महामानवांच्या विचारांचे फलक यासह ढोल पथक, संबळ पथक, हलगी पथक, भजनी मंडळ व घोड्यावर बसलेल्या जिजाऊ, सावित्रीमाई यांच्या वेशभूषा केलेल्या मुली हे प्रमुख आकर्षण होते. ही विवेकयात्रा उमरगा शहरात हुतात्मा स्मारक ते काळा मारुती मंदिर या मार्गावर निघाली. सर्व वयोगटातील महिला व पुरुषांनी यात सहभाग नोंदवला.
विवेक यात्रेत शांताबाई चव्हाण, अॅड. शीतल चव्हाण, सत्यनारायण जाधव, राजू भालेराव, करीमभाई शेख, राजू बटगिरे, अॅड. ख्वाजा शेख, धानय्या स्वामी, प्रदिप चौधरी, दादा माने, विजय चितली, बबिता मदने, किशोर औरादे, सिद्राम जमादार, खंडू बिराजदार, विजयकाका जाधव, कॉ. अरुण रेणके, बालाजी इंगळे, कमलाकर भोसले, अनिल मदनसूरे, विनोद देवरकर, धम्मचारी प्रज्ञाजित, धीरज बेळंबकर, युसुफ मुल्ला, विश्वनाथ महाजन, रेखाताई पवार, सुनिता खंडागळे, पद्माकर मोरे, किरण सगर, अमोल चव्हाण, विठ्ठल चिकुंद्रे, अॅड.बालाजी सोमवंशी, इस्माईल शेख, अभय रेणके, दिनकर पाटील, संतोष चव्हाण, दिपक चव्हाण, विष्णू चव्हाण, एल.वाय. माने, माधव चव्हाण, मीनाताई साळूंके, एजाज पटेल आदींची उपस्थिती होती.
——————