– रामदास आठवलेंना बुलढाणा जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही – रिपब्लिकन सेना
चिखली (तालुका प्रतिनिधी) – नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच दिवशी (दसरादिनी) बौद्ध धर्म स्वीकारला होता. पण, बाबासाहेब आंबेडकर यांची इच्छा नसताना त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, असे बेजबाबदार वक्तव्य केले होते. त्यांच्या या अर्थहिन वक्तव्याबद्दल डॉ. आंबेडकर अनुयायींसह बौद्ध समाजात तीव्र संतापाची लाट उसळली असून, आठवले यांनी बौद्ध समाजाच्या भावना दुखविल्याने त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्यावतीने चिखली तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी आणि चिखलीचे ठाणेदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. आठवले यांनी तातडीने बौद्ध समाजाची माफी मागावी, अन्यथा जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारादेखील रिपब्लिकन सेनेच्यावतीने देण्यात आला आहे.
सविस्तर असे, की रिपब्लिकन सेनेच्यावतीने आज (दि.६) तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी व ठाणेदार चिखली यांना निवेदन देण्यात आले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतराविषयी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काढलेले गैरउदगार हे फक्त भाजप मंडळींना खुश करण्यासाठी असावे, यावरून सर्व बौद्ध बांधवांच्या भावना दुखावून एक प्रकारची चीड निर्माण झाली आहे. ज्या रामदास आठवले यांना मंत्री बनवले ते स्वतःच्या कतृत्वावर नसून फक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळे त्यांना केंद्रीय मंत्रिपद मिळालेले आहे, हे त्यांनी विसरता कामा नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३५ साली येवले मुक्कामी धर्मांतराची घोषणा केली होती, त्यावर २१ वर्षे त्यांनी सर्व धर्मांचा सखोल अभ्यास करून १४ ऑक्टोबर १९५६ झाली नागपूर येथे जाहीररित्या बौद्ध धर्म स्वीकारला, हे सर्व जगाला माहिती आहे. जर बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला नसता, आणि आठवले यांच्यासारखी जनसंघात जाऊन हुजरेगिरी केली असती, तर रामदास आठवले यांच्या चड्डीला आज दोन दोन थिगळे असती व ते आज मंत्री नाही तर नाली साफ करताना दिसले असते. रामदास आठवले यांचा अभ्यास व ज्ञान फारच त्रोटक आहे, ते फक्त वेड्यावाकड्या कविता बोलून पंतप्रधान व इतर लोकांना हसवतात, तर यावरून त्यांना असे वाटते की मी फारच मोठा कवी आहे. परंतु हा त्यांचा भ्रम आहे. रामदास आठवले यांनी समाजाच्या हितासाठी कोणतेही कार्य केले नाही, त्यामुळे सर्व समाज हा आठवलेंवर नाराज आहे, आणि त्यातच हे असले बालिश वक्तव्य करून बौद्ध बांधवांच्या भावना त्यांनी दुखावल्या आहेत. तरी त्यांनी अतिशय बेजबाबदार व तथ्यहिन वक्तव्य करून बौद्ध बांधवांच्या भावना दुखावल्याच्या कारणावरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंदवावा, आणि त्यांनी काढलेल्या उदगारामुळे बौद्ध बांधवांच्या भावना दुखावल्या म्हणून सर्व बौद्ध बांधवांची जाहीर माफी आठवले यांनी मागावी, अन्यथा रिपब्लिकन सेनेतर्पेâ जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व भविष्यात आठवले यांना बुलढाणा जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही, असा खणखणीत इशारा जिल्हा अध्यक्ष भाई विजयकांत गवई, जिल्हा उपाध्यक्ष ब्रह्माभाऊ साळवे, जिल्हा महासचिव सलीमभाई यांनी दिला आहे. हे निवेदन देतेवेळी सुरेशभाऊ इंगळे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शेख मुख्तार, रमेश अंभोरे शहर उपाध्यक्ष, सतीश पवार शहर उपाध्यक्ष, अन्सार भाई तालुका उपाध्यक्ष, सतीश इंगळे तालुकासंघटक, शेख वशिम तालुका उपाध्यक्ष, प्रदिप हिवाळे, विश्वनाथ सपकाळ, शेख दानिश, दीपक तायडे, शेख जावेद, राहुल साळवे, विजय वाधवाणी, यश बावस्कर, देवा शिसागर, विकी निकाळजे, स्वराज क्षीरसागर, रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.