BULDHANAChikhali

भोगवती नदीच्या बांधकामाधीन पुलाच्या पर्यायी रस्त्याला पडले अचानक भगदाड!

– ठेकेदाराची हेकेखोरी परिसरातील प्रवाशांसाठी बनली डोकेदुखी

चिखली (एकनाथ माळेकर) – साखरखेर्डाजवळील भोगवती नदीवरील पुलाचे काम सुरु असल्याने तात्पुरत्या स्वरुपात निर्माण केलेल्या पर्यायी रस्त्यावरच मोठे भगदाड पडल्याने आज या रस्त्याने अमरापूरकडे देवीला जाणार्‍या भाविकांसह प्रवाशांचे मोठे हाल झाले. बराचवेळ वाहतूक ठप्प पडली होती. परंतु, साखरखेर्डा पोलिस ठाण्याचे ठाणेदार यांनी पथकासह धाव घेऊन ही वाहतूक सुरुळीत केली. पाण्यापावसात हा रस्ता खचून जातो, इथपर्यंत ठीक होते. परंतु, आता तर पाऊस नसताना या रस्त्याला भगदाड पडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भोगवती नदीवरील या पुलाचे काम रखडले असून, काम सुरु असल्याने ठेकेदाराने पर्यायी रस्ता तरी चांगला करून देणे अपेक्षित असताना ठेकेदाराच्या हेकेखोरपणामुळे वारंवार या मार्गावर वाहतुकीचा खेळखंडोबा होत आहे.

सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा गावाजवळील भोगावती नदीवर पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे पुलाच्या साईडने सदर ठिकाणी पर्यायी रस्ता करून दिला आहे. परंतु सदर रस्ता हा चार ते पाच वेळेस पाण्यामुळे खचून गेला असून, आज तर पाणी नसतानासुद्धा रस्त्यामध्ये भगदाड पडले. परिणामी, वाहतूक ठप्प होऊन खोळंबा निर्माण झाला. त्यामुळे गावातील नागरिक तसेच साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार आडोळे यांनी ताबडतोब जेसीबी बोलून सदर रस्ता सुरळीत केला. त्यामुळे वाहतूक मार्गी लागली. ठेकेदाराने तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी रस्ता करताना, त्यात नुसते दगडमाती भरून रस्ता तयार केला. वाहतुकीमुळे किंवा अन्य कारणाने या रस्त्याला मधोमध भगदाड पडले. त्यामुळे वाहतूक ठप्प होऊन एकच तारांबळ उडाली होती. याची माहिती गावातील सुज्ञ नागरिकांना तसेच साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन सदर रस्ता सुरळीत करून दिला.

साखरखेर्डा हे परिसरातील महत्वपूर्ण गाव असून, तेथील ग्रामपंचायत लवकरच नगरपालिका होण्याच्या मार्गावर आहे. परंतु, या गावाला लागलेले भोगवती नदीच्या पुलाचे ग्रहण काही सुटता सुटेना. संबंधित ठेकेदार पुलाचे काम लवकर उरकत नसल्याने मोठी समस्या निर्माण झालेली आहे. तसेच, पर्यायी रस्तादेखील नीट करून दिलेला नाही. साखरखेर्डा, लव्हाळा, अमडापूर या रस्त्याने सध्या अमरापूर येथील देवीसाठी जाणारे भरपूर प्रवासी व भाविक आहेत. सध्या नवरात्र सुरू आहे, त्यामुळे साखरखेर्डा, दुसरबीड, सिंदखेडराजा येथील भाविकभक्त अमरापूर येथे देवीच्या दर्शनासाठी जात आहेत. त्यांना आजच्या भगदडामुळे मोठा त्रास सोसावा लागला. पुलाचे काम होईपर्यंत साईडने रस्ता करून देणे हे संबंधित ठेकेदाराचे काम आहे. हाच रस्ता चार ते पाच वेळेस वाहून गेला तरी ठेकेदार त्याचे काम नीट करत नाही. तेव्हा जिल्हाधिकारी यांनीच या ठेकेदाराला वठणीवर आणावे, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांतून पुढे आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!