अर्जुन खोतकर यांच्या ताफ्याला समृद्धी महामार्गावर अपघात!
– परवानगी नसताना समृद्धी महामार्ग वापरलाच कसा?
– शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी तब्बल ५०० समर्थक नेले
औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी) – सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला केलेला नसतानाही माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या कार्यकर्त्यांनी आज समृद्धी महामार्गाचा वापर केला. एवढेच नाही तर त्यांच्या गाड्या मुंबईच्या दिशेने भरधाव जात असताना, दौलताबादजवळ ८ ते १० गाड्यांनी एकमेकांना जोरदारपणे ठोकले. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली तरी, काही कार्यकर्ते जखमी झाले असून, वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे उद््घाटनाआधीच समृद्धी महामार्गाचा वापर केल्याप्रकरणी खोतकर यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे. खोतकर यांच्या ५०० समर्थकांची वाहने या मार्गावरून गेली आहेत. उद्याच्या शिंदे गटाच्या मुंबईतील मेळाव्यासाठी हा सर्व खटाटोप शिंदे गटाने बेकायदेशीरपणे चालवला असल्याचे उघड झाल्याने सर्वस्तरातून संताप व्यक्त होत आहे.
शिवसेनेचे बंडखोर नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून मुंबईतील बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्यात येत आहे. या मेळाव्यासाठी मुंबईला निघालेले शिंदे गटाचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांच्या वाहनांच्या ताफ्याने आज समृद्धी महामार्गाचा बेकायदेशीर वापर केल्याचे आजच्या अपघाताने उघडकीस आले. त्यांच्या ताफ्यामधील ८ ते १० गाड्यांना अपघात झाला. दौलताबादजवळ ही घटना घडली. दरम्यान समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाला अद्याप मुहूर्त मिळाला नाही. नेते मंडळी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी हा महामार्ग खुला केल्याने आता शिंदे गटावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. सर्वसामान्यांसाठी जो महामार्ग बंद आहे, त्याच महामार्गावर अर्जुन खोतकर यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या निघाल्या. कुणी तरी अचानक ब्रेक मारल्याने मागून भरधाव येत असलेल्या गाड्या एकमेकांवर आदळल्या. या अपघातात काही कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
—————–