BULDHANAChikhali

गौरी, गणपतीपाठोपाठ अख्खा नवरात्री उत्सवदेखील भारनियमनाच्या वरवंट्याखाली!

चिखली (एकनाथ माळेकर) – महावितरणच्या भोंगळ कारभाराने ग्रामीण भागात वीज पुरवठ्याचा खेळखंडोबा केला असून, शेतकरी, ग्रामस्थ, विद्यार्थी, व्यापारी सर्वच परेशान करून सोडले आहेत. भरमसाठ वीज बिले घेताना वीज पुरवठा मात्र तसा केला जात नाही. महालक्ष्म्या, गणपती पाठोपाठ आता अख्खी नवरात्रदेखील महावितरणच्या नतद्रष्टपणामुळे भारनियमनाच्या वरवंट्याखाली चिरडल्या गेली आहे.

पाडळी शिंदर्‍या परिसराला देऊळगावमही विद्युत उपकेंद्रावरून वीज पुरवठा केला जातो. देऊळगाव मही येथे ३३ केव्ही सब स्टेशन असून त्यावरून तीन गावठाण व तीनच कृषीपंप फिटरला वीज पुरवठा होतो. असे असतांना डिग्रस गावठाणला वीज पुरवठा करणारी व्हीसीबी नादुरुस्त झाल्याने डिग्रस कृषीपंप व्हीसीबीवरच गावठाण व कृषी वीजपुरवठ्याचा भार टाकल्याने व सद्यस्थितीत पावसाने विश्रांती घेतली असल्याने, मुबलक पाणी उपलब्ध असल्याने शेतकरीवर्गांची पिकांना पाणी देण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. असे असताना एकाच व्हीसीबीवर गावठाण व कृषीचा भार झेपावत नसल्याने भारनियमाचे हत्यार वापरले जात आहे. त्यामुळे कृषीचा वीज पुरवठा हा एक आठवडा रात्री तर एक आठवडा दिवसा कृषी पंपाना होत असतो.

कृषी पंपाचा वीज पुरवठा रविवारपर्यंत रात्री बारा ते आठ असल्याने गावठाणचा वीज पुरवठा सकाळीच पाच वाजता बंद करून आठ वाजेपर्यंत बंदच ठेवण्यात येतो. तर काल ३ ऑक्टोबर पासून कृषी पंपाचा वीज पुरवठा आठवडा भरासाठी दिवसा सुरू असून, सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत असल्याने गावठाण वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे सद्यस्थितीत सुरू असलेला नवरात्री उत्सव या अघोषित भारनियमनाने प्रभावित होत असून, या अगोदरसुद्धा पावसाने गौरी गणपती उत्सवात दडी मारल्याने शेतकरीवर्ग यांनी पिकांना पाणी देणे सुरू केले होते. तेंव्हासुद्धा गावठाण व्हीसीबी नादुरुस्त असल्याने गावठाण कृषीसाठी बंद ठेवण्यात येत होते. ती व्हीसीबी अद्यापपर्यंतही दुरुस्त न केल्याने अघोषित भारनियमन ही परंपरा नवरात्री उत्सवातसुद्धा कायमच आहे. ही नादुरुस्त व्हीसीबी दुरुस्ती करण्याकडे महावितरणच्या निष्क्रिय अधिकार्‍यांनी पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. नवरात्री उत्सवात अघोषित भरनियमनाने महावितरणविषयी ग्रामस्थांतून तीव्र रोष व्यक्त होत आहे. गावठाणवर अनेक ठिकाणी कृषीचा भार आहे याकडे महावितरणचे अधिकारी मुंग गिळुन बसले आहेत. गावठाणवरील कृषी पंप काढण्याकडे दुर्लक्ष करून हे अधिकारी मोकळे झालेले आहेत.
——————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!