अनिल देशमुखांना जामीन मंजूर, संजय राऊतांचा दसरा कारागृहातच!
– संजय राऊतांचा जेलमधील मुक्काम १० ऑक्टोबरपर्यंत वाढला
मुंबई (प्राची कुलकर्णी) – मनी लाँड्रिंगप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयात आज जामीन मिळाला आहे. एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर देशमुखांना जामीन मंजूर झाला, तर दुसरीकडे, पत्राचाळ घोटाळाप्रकरणी अटकेत असलेल्या शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली आहे. न्यायालयाने राऊत यांच्या कोठडीमध्ये १० ऑक्टोबरपर्यंत वाढ केली. त्यामुळे राऊतांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. अनिल देशमुखांना जामीन मंजूर झाला असला तरी, त्यांची बाहेर येण्याची शक्यता कमी आहे. कारण, ईडीच्या प्रकरणात देशमुखांना हा जामीन मिळाला असला तरी, सीबीआयच्या प्रकरणात अद्याप त्यांना जामीन मंजूर झालेला नव्हता.
अनिल देशमुख यांना ईडीने नोव्हेंबर २०२१ मध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. ईडीने देशमुखांवर वसुलीचे आरोप लावलेले आहेत. ईडीच्या या आरोपानुसार, देशमुख यांनी मुंबईतील विविध बार व रेस्टॉरंट चालकांकडून जवळपास ४.७० कोटी रुपये घेतलेले आहेत. तसेच, त्यांनी गैरमार्गाने पैसा कमावून हा पैसा नागपूरस्थित श्री साई शिक्षण संस्थेच्या खात्यात वळती केला. ही संस्था देशमुख कुटुंबीयांच्या अधिपत्याखाली आहे. या शिवाय, माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख हे गृहमंत्री असताना त्यांनीच पोलिस अधिकार्यांना मुंबईतील बार मालकांकडून महिनाकाठी १०० कोटी वसुलीचे आदेश दिले होते, असा गंभीर आरोपही परमबीरसिंह यांनी केला होता. या आरोपांना अनिल देशमुख यांनी फेटाळून लावले होते. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
दुसरीकडे, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याआधी खासदार संजय राऊत बाहेर येतील, अशी अपेक्षा शिवसैनिकांना होती. पण कोठडीत वाढ झाल्याने शिवतीर्थावर होणार्या दसरा मेळाव्यात संजय राऊत हजर राहू शकणार नाहीत, हे आता स्पष्ट झाले आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणी १० ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार आहे. तोपर्यंत राऊतांचा कारागृहातील मुक्काम वाढलेला आहे.
——————-