लातूर (जिल्हा प्रतिनिधी) – लातूर ते उदगीर मार्गावरील लोहारानजीकच्या पेट्रोलपंपाजवळ भरधाव कार आणि एसटी महामंडळाची बस यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात, कारमधील पाच जण जागीच ठार झाले असून, एक जण गंभीर जखमी झालेली आहे. हे प्रवासी तुळजापूरला देवीच्या दर्शनासाठी जात होते. कारच्या चालकाने रस्त्यावर पडलेले कुत्रे पाहून अचानक कार वळवली, ही भरधाव कार समोरून येणार्या बसला जाऊन धडकली, आणि ही दुर्देवी घटना घडली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.
उदगीर येथील चामवाड हॉस्पिटलजवळून हे सहा प्रवासी मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास एमएच २४ एबी 0४०८ या क्रमांकाच्या मारूती सुझुकी कारने तुळजापूरला देवीदर्शनासाठी जात होते. सकाळी भरधाव जात असताना, कारचालकास रस्त्यावर कुत्रे पहुडलेले दिसले म्हणून त्याने कार अचानक वळवली. तेवढ्यात समोरून येणारी बसही भरधाव असल्याने दोन्ही वाहनांची समोरासमोर जोराची धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता, की कारमधील पाच जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झालेला आहे. उदगीर उपविभागाचे पोलीस अधिकारी डॅनियल जॉन बेन, उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे जेष्ठ पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे आणि त्यांचे सहकारी माहिती समजतात घटनास्थळावर रवाना होऊन मदत कार्य युद्धपातळीवर सुरू केले होते. मृत व जखमींना पोलिसांनी उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते. तेथे शवपरीक्षण केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरु होती.
या अपघातात, प्रियांका गजानन बनसोडे (रा. येरोळ, हल्ली मुक्काम गोपाळनगर, उदगीर), ही गंभीर जखमी झाली असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. आलोक तानाजी खेडकर (रा.संत कबीरनगर उदगीर), कोमल व्यंकट कोदरे (रा. डोरनाळी, ता. मुखेड), अमोल जीवनराव देवकाते (रा. रावणकोळा), यशोमती जयंतराव देशमुख (रा.यवतमाळ) आणि चालक नागेश ज्ञानेश्वर गुंडेवार (रा. बिदर रोड, उदगीर) हे पाच जण या अपघातात ठार झाले आहेत. सकाळी सकाळी झालेल्या या अपघाताने उदगीर शहरात खळबळ उडाली होती.
—————