महानगरपालिका, नगरपालिकांच्या शाळांतील शिक्षकांची तब्बल १२ हजारांवर पदे रिक्त!
प्रकाश कथले
वर्धा – राज्यातील महानगरपालिका तसेच नगरपालिकांच्या शाळांतील शिक्षकांची किमान १२ हजार पदे रिक्त असून, या पदांची भरती करण्याकडे अद्याप शासनाचे लक्ष नसल्याचीच परिस्थिती समोर आली आहे. नगरपालिकेच्या किंवा महानगरपालिकेच्या शाळांत जनसामान्यांची मुलेच शिक्षण घेतात. धनदांडग्यांना खासगी शाळांतील महागड्या शिक्षणाची दारे नेहमीच खुली राहतात. पण जनसामान्यांच्या मुलांच्या शिक्षणाकरीता या शाळांत नियुक्त शिक्षकांची पदे येवढ्या मोठ्या प्रमाणावर रिक्त राहात असतील तर येथे मुलांच्या मोफत शिक्षणाचा हक्क ओशाळणारच आहे.
दुर्गम क्षेत्रात राहणारी बालके, विकलांग बालके,वंचित गटातील बालके, समाजाच्या दुर्बल घटकातील बालके,शाळेत न जाणारी बालके, जी शाळा सोडून गेलेली आहेत अशी बालके, यांना शिक्षणाचा मोफत हक्क मिळाला पाहिजे आणि ती बालके शिक्षणाच्या प्रवाहात आली पाहिजे याकरीता भारत सरकारने ‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९’ तयार करुन १ एप्रिल २०१० पासून अंमलात आणला आहे. या अधिनियमाच्या कलम ३८ ची पोट – कलमे (१) व (२) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन राज्य शासनाने ११ ऑक्टोबर२०११ रोजी नियम केले.परंतू या नियमानंतर मागील २०११ पासून शिक्षकांची पदभरतीच करण्यात आलेली नाही. सद्यस्थितीत राज्यातील महानगरपालिकांच्या शाळेत शिक्षकांची एकूण मंजूर पदे १९ हजार ९६० असून कार्यरत फक्त ८ हजार ८६२ आहेत तर रिक्त पदे ११ हजार ९८ आहे. नगरपालिकांच्या शाळेत शिक्षकांची एकूण मंजूर पदे ६ हजार ३७ आहे यापैकी कार्यरत ५ हजार १३६ आहेत. तर रिक्त पदे ९०१ आहे.महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या शाळांमध्ये शिक्षकांची एकंदरीत २५ हजार ९९७ पदे मंजूर असून त्यापैकी १३ हजार ९९८ पदांवर शिक्षक कार्यरत आहेत. तर तब्बल ११ हजार ९९९ पदे रिक्त आहेत.शिक्षणासाठी कायदा व नियम केल्यानंतरही शिक्षकांची अध्र्याला अर्धीच पदे रिक्त राहणे ही बाबच गंभीर आहे.
राज्यात २०११ पासून शिक्षक भरती करण्यात आली नाही परिणामी राज्यातील महानगरपालिका तसेच नगरपालिकांच्या शाळांमध्ये १२ हजारांवर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. महानगरपालिका,नगरपालिकेच्या शाळेत झोपडपट्टीत राहणारी, विटभट्टी मजूर, कारखान्यात काम करणार्या मजुरांचीच मुले मोठ्या प्रमाणात शिक्षण घेतात. गरीबांच्या मुलांना शिकविण्याकरीता शिक्षकच नसतील तर मुलें शिकणार कशी? गरीबांची मुले शिकली पाहिजे, असे वाटत असेल तर ही १२ हजारांवर शिक्षकांची रिक्तपदे तातडीने भरली गेली पाहिजे.
– राजू मडावी, नागपूर विभागीय अध्यक्ष, ट्रायबल फोरम नागपूर