नियमित पीककर्ज फेड करणार्यांना १५ दिवसांत मिळणार प्रोत्साहनपर अनुदान
मुंबई (प्राची कुलकर्णी) – महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत येत्या १५ दिवसांत शेतकर्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची तयारी शासन पातळीवर पूर्ण झाली आहे. राज्यातील जवळपास २८ लाख शेतकर्यांना या अनुदानाचा लाभ मिळेल. हे अनुदान देण्याबाबत काही तांत्रिक त्रुटी आहेत, त्या दूर करण्याच्या सूचना मंत्रालय स्तरावरून संबंधितांना देण्यात आल्या आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीपण जाहीर होऊ शकतात. त्यामुळे आचारसंहितेपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.
महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अल्पमुदत पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणार्या शेतकर्यांना प्रत्येकी ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. बँकांनी दिलेल्या याद्यांची छाननी आता पूर्ण झाली असून, आधार प्रमाणीकरणानंतर अंतिम याद्या प्रसिध्द होऊन त्याचे चावडी वाचन होईल. त्यानंतर १५ दिवसांत अनुदानाची रक्कम शेतकर्यांच्या बचत खात्यात जमा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
नियमित पीककर्जाची परतफेड करणार्या अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना काही अटींमुळे ५० हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नव्हते. दरम्यान, याची दखल घेऊन लवकरच अशा पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना या योजनेतून वगळले जाणार नाही. याबाबतचा शासन निर्णय पुढच्या कॅबिनेट मिटींगमध्ये काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढला होता. त्यानुसार, सरकारने निर्देश जारी केले आहेत. २०१७-१८ ते २०१९-२० या तीन वर्षांत दोन वर्षे कर्जाची नियमित परफेड केली असल्यास त्यांना अनुदान देण्याचा निर्णय झाला असून, २०१९ मध्ये अतिवृष्टी, महापुरामुळे बाधित झालेल्या शेतकर्यांनाही त्याचा लाभ दिला जाणार आहे. कृषी विभाग व बँकांकडून प्राप्त याद्यांची छाननी पूर्ण झाल्यानंतर आता अंतिम याद्या जाहीर करण्याची तयारी सहकार विभागाने केली आहे.
——————