बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) : जिल्हा पत्रकार भवन हे सर्वसामान्यांसाठी समस्या मांडण्याकरता हक्काचे व्यासपीठ ठरावे, अशी अपेक्षा दैनिक देशोन्नती’चे मुख्य संपादक तथा किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पाेहरे यांनी व्यक्त करुन बुलढाणा जिल्हा पत्रकार भवनासाठी पैशाचे आमिष न दाखवता जे काम २५ वर्षांत कोणाला जमले नाही, ते आ.संजय गायकवाड यांनी ५० लाख रुपयांचा निधी घोषित करुन नव्हेतर प्रत्यक्ष देऊन करुन दाखविले, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
बुलढाणा जिल्हा पत्रकार भवनाच्या विस्तारीत कामाचे भुमिपूजन विधिवत पध्दतीने प्रकाशभाऊ पोहरे, खा.प्रतापराव जाधव, व्हॉईस ऑफ मिडियाचे अध्यक्ष संदिप काळे यांच्याहस्ते व आ.संजय गायकवाड यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. प्रकाशभाऊ पुढे म्हणाले की, पत्रकार भवनाच्या विस्तारीकरणासाठी याअगोदर अनेकांनी आश्वासने दिली. परंतु हल्लीच्या नेत्यांच्या वागण्यात लबाडांचं आवतन जेवल्याशिवाय खरं नाही, असं असतांना तसं काहीही न करता आ.संजय गायकवाड यांनी मात्र ५० लाखाचा भरघोस निधी या पत्रकार भवनासाठी उपलब्ध करुन दिला. पत्रकार भवन हे इतरांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी हक्काचं व्यासपीठ असल्याने, असे भवन प्रत्येक जिल्हा ठिकाणी उभारल्या गेले पाहिजे.. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बुलढाणा अर्बनचे भाईजींनी अन्नाच्या नासाडीसाठी जी अभिनव योजना जाहिर केली तिचे कौतुक करत असतांना प्रकाशभाऊंनी रासायनिक शेतीमुळे बिघडत असलेले आरोग्य, वाढत चाललेल्या दवाखान्यांची संख्या.. यावर चिंता व्यक्त करुन ज्यावेळी पोलिसांसह विविध यंत्रणांवरील भार कमी होईल, तेव्हा खNयाअर्थाने विकास झाला.. असे म्हणता येईल, असे यावेळी प्रकाशभाऊ पोहरे म्हणाले.
धान्य साक्षरता काळाची गरज-भाईजी
काही गोष्टी विधिलिखीत असतात, गेल्या काळात अनेक आमदार आले अन् गेले. पण या पत्रकार भवन विस्तारीत काम हे संजुभाऊंच्या हस्तेच विधिलिखीत होते, अशी सुरुवात राधेश्याम चांडक यांनी करुन आ. संजय गायकवाड यांनी लावलेला कामाचा धडाका पाहून ते मंत्रालयात धमकी देऊन निधी आणतात की काय? असे हसत हसत म्हटले. भाईजी पुढे म्हणाले की, देशभरात दरवर्षी १.१२ कोटी टन धान्य साठवणूक करण्याची व्यवस्था नसल्याने नष्ट होते. एवढ्यात अनेक देशांची भूक भागू शकते. ते थांबवण्यासाठी ‘वॉर अगेन्स्ट वेस्ट’ म्हणजेच ‘धान्य साठवणूक साक्षरता’ ही काळाची गरज असल्याचे त्यासाठी बुलढाणा अर्बन पुढाकार घेणार असल्याचे ते म्हणाले.
पत्रकारांची अशी एकजूट अभुतपूर्व- काळे
बुलढाणा जिल्हा हे पत्रकारितेचे आदर्श उदाहरण आहे. या ठिकाणचे पत्रकार मतभेद बाजूला सारुन कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येतात, ही अभुतपूर्व एकी अतिशय महत्वाची असल्याचे प्रतिपादन व्हॉईस ऑफ मिडियाचे संस्थापक अध्यक्ष संदिप काळे यांनी व्यक्त करुन संजय गायकवाड यांच्यासारखी विकासाची दृष्टी असणारा आमदार प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पत्रकार भवन भुषणावहच – खा.जाधव
१९९५ला पत्रकार भवन निर्मितीसाठी तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी निधी देऊन भुमिपूजन केले होते. ते शिवसेनेचेच होते व आताही शिवसेनेचेच आमदार संजय गायकवाड यांनी निधी देऊन विस्तारीत कामाचे भुमिपूजन केले, त्यामुळे हे पत्रकार भवन एक भुषणावह असल्याचे खा.प्रतापराव जाधव म्हणाले. ते पुढे म्हणाले की, आ.संजय गायकवाड यांनी विकास कामांचा जो धडाका लावला आहे व त्यांची जी स्तुती होत आहे ती ऐकून मला माझा निर्णय चुकला नसल्याचे समाधान होते.. असेही ते म्हणाले.
पत्रकारांनी सजग राहणे गरजेचे-आ.गायकवाड
१९९३-९४ ला नगरसेवक असतांना पत्रकार भवनाला जागा मिळावी, असा आलेला प्रस्ताव माझ्या-मुळेच मंजूर झाला होता व आज त्याच पत्रकार भवनाला आमदार म्हणून निधी देतांना होत असलेला आनंद हा अभुतपूर्व आहे. हे पत्रकार भवन पाहून अन्य आमदार त्यांच्याही जिल्ह्यात अशा भवनाची मागणी करतील व संवेदनशील मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे ती पूर्णत्वास नेतील, असाही विश्वास आ.संजय गायकवाड यांनी व्यक्त करुन बुलढाणा शहरात वाढलेले अवैध धंदे, पान टपरीत मिळत असलेली दारु, चोरीला जात असलेल्या गाड्या.. अशा बाबींवर पत्रकारांनीही सजग राहण्याची गरज त्यांनी व्यक्त करुन गेल्या ७० वर्षांत जेवढा निधी आला नव्हता, त्यापेक्षा जास्त निधी या अडीच वर्षात मी आणला असलातरी माझी विकासाची भूक अजूनही भागली नसल्याचे ते म्हणाले.
प्रास्ताविकातून जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांनी पत्रकार भवनाचा इतिहास सांगत, आ.संजय गायकवाड यांनी केलेल्या शब्दपूर्तीचा उल्लेख केला. यावेळी मराठी पत्रकार परिषदेच्या विभागीय सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल अमर राऊत, स्थानिक बीसीसीएनला २५ वर्ष पुर्ण झाल्याबद्दल सुधाकर अहेर व व्हॉईस ऑफ मिडियाच्या विदर्भ अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल अनिल म्हस्के यांचा सत्कार करण्यात आला. सुत्रसंचलन संदिप चव्हाण तर आभार प्रदर्शन अरुण जैन यांनी केले.