म्हैसूर (विशेष प्रतिनिधी) – भरपावसात सभा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी २०१९च्या लोकसभा निवडणुकीतील वातावरण पालटवले होते. अगदी त्याच सभेची आठवण ताजी व्हावी, अशी भरपावसातील सभा काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी म्हैसूर येथे घेतली व कर्नाटक अक्षरशः जिंकून घेतले. कर्नाटकमध्ये राहुल गांधी यांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत. रविवारी राहुल गांधी यांनी येथील नंजनगुडच्या प्रसिद्ध प्राचीन श्रीकांतेश्वर स्वामी मंदिराला भेट दिली. यानंतर सायंकाळी त्यांनी म्हैसूर येथील एपीएमसी मैदानावर सभेला संबोधित केले. राहुल यांचे भाषण सुरू होताच अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. मात्र, तरीही त्यांनी भाषण सुरूच ठेवले. या भाषणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी २०१९ साली सातार्यात मुसळधार पावसात केलेले भाषण आजही सर्वांना आठवत असेल. या भाषणानंतर जे घडले ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. २०१९ च्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीआधी पवारांनी मुसळधार पावसात राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना निवडून आणण्याची साद मतदारांना घातली होती. यानंतर आता तीन वर्षांनंतर काँग्रेस खासदार राहुल गांधींनीही मुसळधार पावसात भाषण करत या आठवणी ताज्या केल्या. या सभेत बोलताना राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएसवर जोरदार निशाणा साधला. दरम्यान, काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते पावसाच्या दरम्यान राहुल गांधींच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. यावेळी बोलताना त्यांनी भर पावसात सभेला उपस्थित राहिलात नागरिकांचे देखील आभार मानले.
राहुल गांधींनीही त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबत त्यांनी लिहिले की, ‘आम्हाला भारताला एकत्र करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. भारताचा आवाज उठवण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रेला कोणीही रोखू शकत नाही.’
——————–