आमदार डॉ. शिंगणेंच्याच मतदारसंघातील रस्ते उखडले, अधिकार्यांचा लाड ग्रामस्थांच्या जीवावर उठला!
– मेरा ते साखरखेर्डा रस्ता पूर्णपणे उखडला, महिनाभरापूर्वीचे डांबरही उखडले
– मेरा ते अंढेरा रस्त्याची तर पाचच महिन्यात झाली दयनीय अवस्था
चिखली (एकनाथ माळेकर) – बुलढाणा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व राज्यातील वजनदार नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मतदारसंघातील रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली असून, ज्या रस्त्यांवर डांबर टाकण्यात आले, ते रस्तेदेखील महिनाभरात उखडले गेले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खाऊगिरी धोरणामुळे जीवघेण्या रस्त्यांवरून प्रवास करण्याची वेळ मेरा खुर्द, साखरखेर्डा, अंढेरा या परिसरातील ग्रामस्थांवर आलेली आहे. या रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत मेरा खुर्द, मेरा बुद्रूक, अंत्री खेडेकर येथील सरपंचांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वेळोवेळी पत्रव्यवहारदेखील केला होता. परंतु, सरपंचांच्या या पत्रांना बांधकाम विभागाने केराची टोपली दाखवली आहे.
चिखली तालुक्यातील मेरा खुर्द ते साखरखेर्डा या रोडची अवस्था खूपच दयनीय झाली आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग देऊळगावराजा यांच्या हद्दीमध्ये हा रोड येतो. परंतु, या विभागाला लोकांचे मणके तुटत असले तरी काही सोयरसुतक दिसून येत नाही. या विभागाच्या कर्मचार्याला फोन लावला असता, त्याने चक्क प्रतिक्रिया देण्यास टाळले आहे. या आधीसुद्धा मेरा खुर्द, अंत्री खेडेकर, मेरा बुद्रूक येथील सरपंचांनी सार्वजनिक बांधकाम विभाग देऊळगावराजा यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. परंतु कोणत्याही प्रकारची कारवाई न करता अंत्री खेडेकर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ घाण येत होती, ती तात्पुरत्या स्वरूपात दूर केली गेली होती. सदर कामावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे बाबू साने यांनी येऊन जिथे पाणी तुंबते तिथून थातूरमातूर पाणी काढून देण्यात आले होते. हा रोड तातडीने दुरूस्त करणेबाबत मेरा खुर्द, मेरा बुद्रुक, अंत्री खेडेकर येथील सरपंचाचे पत्र घेऊन पाठपुरावा केला गेला होता. परंतु त्याला कोणत्याही प्रकारची यश आले नाही. मेरा-साखरखेर्डा रोड हा अंतिम मंजुरीप्रमाणे दोन्ही साईडने नाल्या करून देण्यात यावे, अशी मागणी वारंवार होत असूनसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी कोणत्याही प्रकारे त्याकडे लक्ष दिले नाही. सदर अधिकारी यांना फोन केला असता, या रस्त्यासाठी सद्या निधी नाही. त्यामुळे हा रस्ता सद्या होणार नाही, असे हे अधिकारी सांगतात.
मेरा, अंत्री खेडेकर सर्कल हे सिंदखेडराजा मतदारसंघात येत असून, या भागाचे आमदार हे माजी पालकमंत्री राजेंद्र शिंगणे हे आहेत. मेरा, अंत्री खेडेकर या गावांमध्येदेखील राजकीय नेत्यांची कमी नाही. जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून या गावाकडे बघितले जाते. या दोन गावांचे लोक प्रतिनिधी जिल्हा परिषदेमध्ये नाही अशी पंचवार्षिक अजून गेली नाही. एका वेळेस तर दोन दोन्ही गावातून दोन जिल्हा परिषद सदस्य आले होते. या गावातील नेत्यांनी जिल्हा परिषदेची मोठमोठी पदेदेखील भोगलेली आहेत. परंतु, सदर रोडच्या खड्ड्यांमुळे ग्रामस्थांना व प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे, त्याचे कुणालाही सोयरसुतक नाही. सध्या नवरात्राचा उत्सव सुरू आहे. जवळच तपोवन देवीचे देवस्थान आहे. या ठिकाणी भाविकभक्त मोठ्या भक्तिभावाने दर्शनासाठी जातात. परंतु रस्ता खराब असल्यामुळे त्यांचे देवदर्शनही एखाद्यावेळी जीवघेणे ठरू शकते. मेरा बुद्रूक – अंत्री खेडेकर हा रस्ता सद्या प्रवाशांच्या जीवावर उठलेला आहे.
आणखी एक धक्कादायक बाब अशी, की मेरा ते अंढेरा या रोडचे डांबरीकरण होऊन एक महिनासुद्धा झालेला नाही. तोच या रोडवरचे डांबर उखडले आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या ठेकेदाराच्या माध्यमातून मेरा बुद्रुक कब्रस्तान ते अंढेरा रोडचे पाच महिन्यापूर्वीच काम करून घेतले होते. परंतु अधिकार्यांच्या खाऊगिरी धोरणामुळे संबंधित ठेकेदाराने थातूर मातूर काम करून रोड पूर्ण केला. शासनाचा लाखो रुपयांचा निधी या रस्त्यावर खर्च झालेला आहे. परंतु लोकप्रतिनिधी, संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांच्या संगनमताने रोडचे बोगस काम झालेले आहे. सदर रोड मेरा बुद्रुक कब्रस्तानापासून अंढेरापर्यंत पूर्णपणे खराब झालेला असून, डांबर उखडून बाजूला पडलेले आहे. मेरा बुद्रुक कब्रस्तानाजवळ चार रोडचा संगम म्हणजे चौफुला आहे. परंतु त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची शासकीय पाटी संबंधित ठेकेदाराने लावलेली नाही. सदर कामही पाच महिन्यातच उखडलेले आहे. संबंधित अधिकार्यांनी सदर काम हे ठेकेदाराच्या वॉरंटीमध्ये आहे का, याची चौकशी करून संबंधित ठेकेदाराकडून पूर्ण करून घ्यावे, अशी जनतेची मागणी आहे. शिवाय, अंढेरा रोडवर मोठ्या प्रमाणात वाळूवाहतूक होत असून, बहुतांश वाळू वाहतूक ही चोरट्या मार्गाने होत आहे. वाळूचे मोठमोठाले डंपर हे या रोडने जात असल्याने हा रोड जागोजागी उखडला असून, मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यात पडून छोटे मोठे अपघात दररोज घडत आहे. मेरा बुद्रूक ते अंत्री खेडेकर हा रोड पुढे जगप्रसिद्ध खार्या पाण्याचे सरोवर लोणारकडे जातो. त्यामुळे हा रोड तातडीने दुरूस्त करण्यात यावा, अशी मागणी या भागातील सर्व ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग देऊळगावराजा यांच्याकडे केलेली आहे. तसेच, या भागाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी याबाबत लक्ष घालावे, अशी मागणीही ग्रामस्थ करत आहेत.
टक्केवारी घेणारे देऊळगावराजाचे अधिकारी-कर्मचारी कोण?, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ लवकरच करणार पर्दाफास!
एक तर देऊळगाव राजा सर्कलमधील रस्त्यांची बहुतांश कामे बोगस होऊन, मुदतीआधीच रस्ते खराब झालेले आहेत. तरीही बहुतांश रस्त्यांची देयके अदा झालेली आहेत. टक्केवारी घेऊन ठेकेदारांची देयके अदा करणारे अधिकारी व कर्मचारी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या रडारवर आले असून, त्यांच्या विरोधातील एक महत्वपूर्ण तक्रारदेखील मुख्य संपादकांना प्राप्त झालेली आहे. एका अधिकार्याच्या ऑडिओ क्लिपसह व प्राप्त झालेल्या तक्रारअर्जासह ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ लवकरच पर्दाफास करणार असून, याबाबतचे महत्वपूर्ण पुरावेदेखील सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांसह बांधकाम खात्याच्या मुख्य सचिवांकडे मुंबईत दिले जाणार आहेत.
—————–