कोल्हापूर (शिवानी प्रभावळे) – आज ललिता पंचमी, शारदीय नवरात्रौत्सवाच्या सातव्या माळेनिमित्त करवीर काशीमधील वडणगे येथे पार्वती मंदिरामध्ये श्री पार्वती देवी-मातेची करवीर निवासनी अंबाबाई रूपातील पूजा बांधण्यात आली होती. तसेच, आज मंदिरामध्ये कुंकूमार्चन सोहळादेखील पार पडला. या सोहळ्यास महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला. दुसरीकडे, शारदीय नवरात्रोत्सवाच्या सप्तमी तिथीला आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईची बदामी निवासिनी शाकंभरीच्या रूपात पूजा बांधण्यात आली. ही पूजा गजानन मुनीश्वर, मुकुंद मुनीश्वर आणि श्रीनिवास जोशी यांनी बांधली होती. भाविकांनी दर्शनासाठी गर्दीचा उच्चांक केला होता.
दरम्यान, करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शनिवारी भाविकांच्या गर्दीने विक्रम मोडित काढला असून, त्यामुळे प्रशासनाकडून १२ ठिकाणांवर पार्किंगची व्यवस्था करूनही ती तोकडी पडली. कोल्हापूर शहरातील वाहतुकीवर विपरित परिणाम झाल्याचे दिसून आले. शनिवारी तब्बल ४ लाख ८७ हजार ५२१ भाविकांनी दर्शन घेतले. शुक्रवारी ३ लाख २२ हजार ४२५ भाविकांनी दर्शन घेतले होते. त्यामुळे फक्त दोन दिवसांमध्येच साडेआठ लाखांवर भाविकांनी मंदिराला भेट दिली आहे.
भारतीय संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी शारदीय नवरात्र उत्सवानिमित्ताने वडणगे येथे प्रथमच पार्वती देवी-मातेचा कुंकूमार्चन सोहळा आर. टी. ग्रूपचे संयोजक ऋषीकेश ठाणेकर यांनी आयोजित केला होता. सदर कार्यक्रम चारशे महिलांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी डॉ.सौ.मेघा बांभोरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर कार्यकर्त्यांकडून महिलांना प्रसाद म्हणून फळे वाटप करण्यात आली. कार्यक्रमास देवस्थान समितीचे अध्यक्ष दिलीप शेलार, रवींद्र पाटील , दादासो शेलार, रवी मोरे व आर.टी. ग्रूपचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
दुसरीकडे, आज अश्विन शुद्ध नवरात्राच्या सप्तमी तिथीला करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई बदामी निवासिनी शाकंभरीच्या रूपात सजली आहे. बादामीची बनशंकरी ही अनेकांची कुलदेवता. ज्या वेळेला अनेक वर्षांचा मोठा दुष्काळ पडला, तेव्हा ऋषीमुनींनी आणि देवांनी जगदंबेची प्रार्थना केली. त्यावेळेस जगदंबेने प्रगट होऊन स्वतःच्या शरीरातून शाक भाज्या निर्माण करून जगाचे पोषण केले. म्हणून तिला शाकंभरी असे नाव मिळाले. शाकंभरीलाच बनशंकरी म्हणजे वनामध्ये राहणारी देवी असेही म्हटले जाते. प्रतिवर्षी पौष महिन्यात अष्टमी ते पौर्णिमा शाकंभरीचे नवरात्र संपन्न केले जाते. शाकंभरी सिंहावरती विराजमान होऊन आठ हातामध्ये विविध आयुध धारण करते. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईची आजची शाकंभरी रूपातली अलंकार पूजा ही गजानन मुनीश्वर, मुकुंद मुनीश्वर आणि श्रीनिवास जोशी यांनी बांधली होती.
——————–