‘मातोश्री’वर शंभर खोके जायाचे, असे म्हणायचे नव्हते – खा. प्रतापराव जाधव
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – ‘अनिल देशमुख आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे हे आता जेलमध्ये आहेत. हे लोक महिन्याला वसुली करत होते. सचिन वाझे हे दर महिन्याला १०० खोके ‘मातोश्री’वर पाठवत होते’, असा खळबळजनक आरोप खासदार प्रतापराव जाधव यांनी काल मेहकरात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीतील जाहीर सभेत केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर कट्टर शिवसैनिक प्रचंड नाराज झाले होते. ज्या शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे व ‘मातोश्री’ने प्रतापरावांना मोठे केले, त्याच ‘मातोश्री’वर ते घसरले. यावरून जोरदार टीकाही सुरु झाली होती. जनमाणसाचा हा कौल पाहाता, प्रतापरावांनी आपल्या वक्तव्यावरून यू-टर्न घेत, ‘मातोश्री’वर शंभर खोके जायाचे, असे मला म्हणायचे नव्हते, असे स्पष्टीकरण मीडियाशी बोलताना दिले आहे. याबाबतचे सविस्तर वृत्तही ‘महाराष्ट्र टाईम्स’ या दैनिकाने दिले आहे.
दरम्यान, प्रतापरावांच्या या आरोपाला शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत प्रत्युत्तर दिले. शिंदे गटातील आरोपांचा आता कंटाळा यायला लागला आहे. अगदी नीचपणे हे आरोप सुरू आहेत. या आरोपांमध्ये काही तथ्य आहे का हे शोधावे लागेल. जो उठतो तो स्क्रिप्ट घेऊन बोलतो आहे. त्यामुळे यांच्या आरोपाला आम्ही काहीही उत्तर देणार नाही’, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
काल मेहकरात खासदार प्रतापराव जाधव म्हणाले होते, की ”सचिन वाझेने गोळा केलेले कनेक्शन थेट ‘मातोश्री’वर जायचे. किती खोके जायचे माहितीये का… १००!” त्यांचे हे वक्तव्य राज्यातील प्रसारमाध्यमांनी ठळक प्रसिद्ध केल्यानंतर, जनमाणसातून प्रचंड चीड व्यक्त केली गेली. ज्या ‘मातोश्री’ व बाळासाहेब ठाकरे यांनी प्रतापरावांना मोठे केले, त्यांच्या कुटुंबीयांवर असा आरोप करताना प्रतापरावांनी दहावेळा विचार करायला हवा होता, असा सूर लोकांमधून उमटत होता. जनमाणसाचा हा कोनासा पाहिल्यानंतर, आज प्रतापराव जाधव यांनी यू-टर्न घेतला. ‘मी काल केलेल्या आरोपावेळी उद्धव ठाकरे यांचे नाव घेतलेले नव्हते. माझ्या म्हणण्याचा अर्थ एवढाच होता, की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात सचिन वाझे याचे समर्थन केले होते. सचिन वाझे काय दाऊद आहे का? असे त्यांनी म्हटले होते. तसेच तत्कालिन गृहमंत्री देशमुख यांचा राजीनामाही घेतला नव्हता. मला म्हणायचे असे होते की- मविआवर त्या घोटाळ्याचे आरोप होते, मी उद्धव ठाकरे यांचे नाव घेतलेले नव्हते’, अशी सारवासारव खासदार जाधव यांनी मीडियाशी बोलताना केली आहे.
प्रतापरावांचे दिल्लीत वजन वाढणार, संसदेच्या ‘स्थायी समिती’वर वर्णी लागण्याची शक्यता!
शिवसेनेचे बंडखोर नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला केंद्रात महत्वाचे पद देण्याबाबत नियोजन सुरु आहे. लोकसभा आणि राज्यसभेच्या स्थायी समितीची मोदी सरकार पुनर्रचना करणार असून, दोनपैकी एका कमिटीवर खासदार प्रतापराव जाधव यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच, माहिती व तंत्रज्ञान समितीचे अध्यक्षपद काँग्रेस नेते शशी थरूर यांच्याकडे आहे. थरूर यांचे हे पद लवकरच जाणार असून, या कमिटीवरही शिंदे गटाची वर्णी लागू शकते, असे दिल्लीस्थित राजकीय सूत्राने सांगितले आहे.