Breaking newsHead linesMaharashtraPachhim Maharashtra

पुल अर्धवट पडला आणि पुणेकरांनी ‘टोमण्यां’चा स्फोट केला!

– तब्बल ११ तासानंतर सकाळी १० वाजता वाहतूक सुरुळीत सुरू!

पुणे (युनूस खतीब) – पुण्यातील बहुचर्चित चांदणी चौकातील जूना उड्डाणपूल पाडण्याचे काम काल मध्यरात्री १ वाजता फत्ते झाले आहे. तब्बल ६०० किलो स्फोटकांच्या सहाय्याने हा पुल जमीनदोस्त करण्यात आला. दिल्ली येथील ट्वीन टॉवर ही इमारत १२ सेकंदात ईडीफाईस कंपनीने पाडली होती. याच कंपनी मार्फत चांदणी चौकातील हा पूल स्फोटकांनी उडविण्यात आला. या स्फोटाने पुलाचा केवळ मध्यभागच पडल्यानंतर टोमणे मारण्यात पटाईत असलेल्या पुणेकरांनी मध्यरात्रीच टोमण्यांचा सोशल मीडियावर स्फोट घडवला आणि प्रशासनाला धारेवर धरले. एनएचएआय आणि जिल्हा प्रशासन यांनी केलेल्या नियोजनामध्ये अपयश आल्याचे यातून स्पष्ट झाले होते. आता तब्बल ११ तासांनंतर ढिगारा हटवण्याचे काम पूर्ण झाले असून, चांदणी चौकातून वाहतूकही सुरू झाली आहे. त्यामुळे मुंबई-बंगळुरू महामार्गावरील वाहतूकही सुरूळीत झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडी होत असलेल्या चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतर रविवारी सकाळी १० वाजता वाहतूक खुली करण्यात आली होती.

नोएडातील प्रसिद्ध ट्विन टॉवर काही क्षणांत जमीनदोस्त करणार्‍या ईडीफाईस (E्ग्fग्म) कंपनीकडूनच चांदणी चौकातील उड्डाणपूल पाडण्यात आला. मात्र, हा पूल दोन टप्प्यात पाडण्यात आला. ६०० किलो स्फोटकांनी केवळ अर्धाच पूल पडला. उर्वरित पूल नंतर पोकलेनच्या सहाय्याने पाडण्यात आला. त्यामुळे पूर्ण पूल पाडण्यास व ढिगारा हटवण्याच्या कामाला विलंब झाला. याबाबत कंपनीच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, पुलालगतच रहिवासी इमारती असल्याने एकदमच पूर्ण पूल पाडण्यात आला नाही. पूल पाडण्यात आम्हाला अपयश आले, असे काहीही नाही. सर्व नियोजनानुसार करण्यात आले आहे. चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी चांदणी चौकातील एनडीए रस्ता – बावधन पुल पाडण्याचे नियोजन करण्यात आले होते. २ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री एक वाजता पुल पाडण्यात आला. दरम्यान रात्री १ वाजून २० मिनिटांनी पुलाचा राडारोडा काढण्यास सुरुवात झाली होती. पूल न पडल्याने पोकलेनच्या मदतीने दोन्ही बाजूने पूल पाडण्यात आला. त्यात वेळ गेल्याने सकाळी ८ वाजता वाहतूक पूर्ववत करण्याचे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचे नियोजनही कोलमडले. यामुळे रविवारी (२ ऑक्टोबर) सकाळी दोन्ही बाजूने तब्बल १० किलोमीटरपर्यंत जड वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र, सकाळी १० नंतर मुंबई-बंगळुरू मार्गावरील वाहतूक पूर्ववत होण्यास सुरुवात झाली आणि दुपारनंतर वाहतूक पूर्णपणे सुरुळीत झाली होती.

दरम्यान, चांदणी चौकातील पूल पाडण्याआधीच प्रशासनाने सायंकाळ ६ वाजल्यापासून पूल परिसरातील २०० मीटर परिसर निर्मनुष्य करण्यास सुरुवात केली होती. तसेच कलम १४४ लागू करण्यात आले होते. त्यानंतर रात्री ११ नंतर वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात आला. त्याचवेळी पुलाच्या दोन्ही बाजूने भल्या मोठ्या पांढर्‍या पडद्याने संपूर्ण भाग झाकला. जेणेकरून पूल पाडताना त्याचे तुकडे अथवा धूळ परिसरात उडू नये. या बहुचर्चित स्फोटाच्या यशस्वीतेवरच पुणेकरांनी सोशल मीडियावर मीम्स, पोस्ट याद्वारे प्रश्न उपस्थित केले होते. १ हजार ३५० डिटोनेटरच्या स्फोटानंतरही चांदणी चौकातील पूल पूर्णपणे का पडला नाही, यावर कंपनीचे अधिकारी आनंद शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शर्मा म्हणाले, ‘ज्यावेळी हा पूल बांधण्यात आला त्यावेळे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्टीलचा वापर केला गेला. आम्हाला त्या स्टीलचा अंदाज आला नाही. त्यामुळे स्फोटानंतर पुलाचा काही भाग शिल्लक राहिला.’
———-
क्षणचित्रे
१२.४५ मिनिटांनी पोलीस प्रशासनाने पुलाच्या आजूबाजूचा पूर्ण परिसर निर्मनुष्य केला
१२.५० वाजता पोलिसांकडून पुन्हा एकदा अलर्ट
१२.५५ अधिकार्‍यांकडून शेवटची पाहणी
०१.००वाजता ब्लास्ट करण्यात आला
ब्लास्ट झाल्यानंतर पूल फक्त ५० टक्के कोसळला
त्यानंतर जवळपास दहा जेसीबीच्या सहाय्याने बाकी पूल पाडण्यात आला
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!